मागील वर्षी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यात आले आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी हा हल्ला झाला होता. या हल्ल्याला बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षपूर्तीनिमित्त प्रशासनाने काश्मीरमध्ये सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. दहशतवादी हल्ल्यातील २६ बळींची नावे कोरलेले, काळ्या संगमरवरापासून बनवलेले हे स्मारक लिद्दर नदीच्या काठावर उभारण्यात आले आहे. बैसारन खोऱ्यातील कुरणांवर घडलेल्या दहशतवादी हल्ल्याची ते एक गंभीर आठवण म्हणून उभे आहे.
या दहशतवादी हल्ल्यामुळे संबंध देश हादरला होता. २५ पर्यटक आणि एका स्थानिकाचा त्यात मृत्यू झाला होता. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटन उद्योगालाही या हल्ल्याचा मोठा फटका बसला. जम्मू आणि काश्मीर सरकारच्या प्रयत्नांमुळे आता पर्यटन क्षेत्र सावरत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हल्ल्याला एक वर्ष लोटल्यानंतरही या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. त्यांपैकी अनेकांनी हल्ल्याच्या भीतीचा प्रभाव पडू देण्यास नकार दिला. काही पर्यटकांनी येथील सुरक्षा व्यवस्था आणि स्थानिक लोकांच्या आतिथ्याचीही मनापासून प्रशंसा केली. प्रशासनाने पहलगाम आणि परिसरात अतिरिक्त पोलीस व निमलष्करी दल तैनात केले आहे. अनेक ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राजकीय नेते, पीडित कुटुंबीय तसेच स्थानिक रहिवासी सहभागी होणार आहेत.
लष्कराचा निर्धार
पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने मंगळवारी दहशतवादाविरोधातील आपला निर्धार पुन्हा व्यक्त केला. जेव्हा मानवतेच्या सीमा ओलांडल्या जातात तेव्हा दिला जाणारा प्रतिसाद हा निर्णायक असतो, असे लष्कराने ‘एक्स’वर म्हटले आहे. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून ७ मेच्या दरम्यान लष्कराने कारवाई करत पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. देशाला हादरवून सोडणाऱ्या या हल्ल्याचा जगभरातून निषेध झाला होता.
