भोजपुरी गायिका नेहा राठोड हिच्यावर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी लखनऊ पोलिसांनी नेहाला समन्स बजावलं होतं. शनिवारी तिने लखनऊ मधील हजरतगंज पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याचा गुन्हा नेहावर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तिने हजरतगंज पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊ.

भोजपुरी गायिका नेहा राठोड ही लोकगीतांसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या गाण्यांतून ती अनेकदा राजकीय भूमिका मांडत असते. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नेहाने ‘एक्स’वर काही पोस्ट शेअर केल्या होत्या. त्या पोस्ट आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत नेहावर लखनऊमध्ये गुन्हा दाखल झाला होता. लखनऊचे सहाय्यक पोलीस आयुक्त विकास कुमार जैस्वाल म्हणाले, मागील वर्षी एप्रिल महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी नेहाला हजरतगंज पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. तिने येऊन तिचा जबाब नोंदवला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मागील वर्षी जम्मू -काश्मीर मधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नेहाने सोशल मिडिया ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने पहलगाम पर्यटकांच्या मृत्यूबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. लखनऊमधील अभय प्रताप सिंग यांनी नेहा राठोडच्या पोस्टवर आक्षेप घेत तिच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी नेहा राठोड विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता.

अभय प्रताप सिंह यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले होते की, नेहा राठोडच्या सोशल मिडिया पोस्टमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. तसेच राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो. नेहाच्या पोस्टमुळे देशातील सामाजिक सौहार्द बिघडू शकते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी नेहा राठोड विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी तिला समन्स बजावण्यात आले होते.