Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये गेल्यावर्षी २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी महत्वाची माहिती उघडकीस आली आहे. दहशतवादी हल्ल्याशी निगडीत महत्वाचा पुरावा राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) च्या हाती लागला आहे. या पुराव्याचा थेट संबंध चीनबरोबर असल्याचे तपासातून उघड झाले आहे.

काय आहे पुरावा?

राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) ला दहशतवाद्यांनी वापरलेला ‘गोप्रो हिरो १२’ कॅमेरा सापडला आहे. या कॅमेऱ्याचा विक्रेता चीनमधील असल्याचे तपासात आढळून आले आहे. एनआयए न्यायालयाने चीनच्या न्यायालयाकडे याबाबत अधिक माहिती मिळावी यासाठी विनंती पत्र पाठवले आहे. गोप्रो कॅमेरा पुरवठा करणारे आणि त्याचा वापर करणारे कोण आहेत? याची माहिती मिळविण्यात मदत करण्याची विनंती एनआयएने केली आहे. 

इतर महत्वाचे पुरावे देखील हाती

तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन विविध वस्तू, इलेक्ट्रिक उपकरणं, मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, ग्रोप्रो – हिरो १२ हा काळ्या रंगाचा (सी3501325471706) सापडलेला कॅमेरा अत्यंत महत्वाचा पुरावा मानला जात आहे. ठिकाणाची रेकी करण्यासाठी या कॅमेऱ्याचा वापर करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांना याचा वापर केल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

नेदरलँडमधील उत्पादक कंपनीची चौकशी

एनआयएने यापूर्वी नेदरलँड येथील गोप्रो बी व्ही यांच्याशी संपर्क साधून कॅमेऱ्याची विक्रीबाबत चौकशी केली होती. नेदरलँडमधील या कंपनीने कॅमेऱ्यांचा पुरवठा चीनमधील एई ग्रुप या व्यापारी कंपनीला केल्याचे सांगितले. ३० जानेवारी २०२४ मध्ये हे कॅमेरे सुरु करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. पण, त्यापुढील अधिक माहिती नसल्याचे कॅमेरा उत्पादक कंपनीने स्पष्ट केले. कॅमेऱ्याचा सुरुवातीचा वापर किंवा त्यापुढील गोष्टी चीनच्या अखत्यारित येतात, असे नेदरलँड येथील कंपनीने स्पष्ट केले. 

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला

गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक आणि स्थानिकांचा मृत्यू झाला होता. भारताने या घटनेनंतर कठोर पाऊले उचलत पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी रोखले. तसेच, एक महिन्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. दरम्यान, दोन्ही देशात काहीकाळ चकमक झाल्यानंतर १० मे रोजी शस्त्रसंधी करण्यात आली.