Pahalgam terror attack NIA chargesheet: गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील अनेक हल्ल्यांत वाँटेड असणाऱ्या हाफीज सईदचा हात असल्याचं समोर आलं आहे. NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं यासंदर्भात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात हाफीज सईद आणि त्याच्या लष्कर-ए-तय्यबा व द रेझिस्टन्स फ्रंट या दोन दहशतवादी संघटनांनावर देखील आरोप ठेवण्यात आले आहेत. जम्मू येथील विशेष NIA न्यायालयात आज हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
“भारतीय न्याय संहिता २०२३ व बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा १९६७ अंतर्गत हाफीज सईदवर आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, भारताविरुद्ध युद्ध पुकारणं आणि सीमेपलीकडून कट-कारस्थानं करणं ही कलमंदेखील त्याच्यावर लावण्यात आली आहेत”, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने सादर केलेल्या निवेदनात दिली आहे.
LET/TRF ची नेमकी भूमिका काय?
एनआयएच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हाफीज सईदला पहलगाम हल्ल्यात आरोपी करतानाच त्याच्या संघटनेचाही आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्याचं नियोजन, त्यासाठीची मदत आणि अंतिमत: हल्ला घडवून आणणे यात या लष्कर ए तैय्यबा व द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनांचा हात असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
१५९७ पानी मूळ आरोपपत्र
एनआयएनं आज सादर केलेलं आरोपपत्र हे या प्रकरणी आधी सादर केलेल्या १५९७ पानांच्या मूळ आरोपपत्राचाच पुढचा भाग असणार आहे. यामध्ये पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका, हाफीज सईदचा कथित हात यांचा समावेश आहे. याशिवाय, या प्रकरणाच्या तपासादरम्यान शास्त्रशुद्ध पद्धतीने गोळा केलेले पुरावे आणि प्रत्यक्ष तपासणीच्या निष्कर्षांचादेखील समावेश असल्याचं एनआयएच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
साजिद जट्टचाही आरोपींमध्ये समावेश
दरम्यान, १५ डिसेंबर २०२५ रोजी सादर केलेल्या आरोपपत्रात एनआयएनं पाकिस्तानचा हस्तक साजिद जट्ट याचादेखील आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यात राबवलेल्या ऑपरेशन महादेवअंतर्गत खात्मा करण्यात आलेले दोन दहशतवाही आणि अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांचादेखील या आरोपपत्रात समावेश आहे.
