NIA seeks Aid From Public : पहलगाम हल्ल्याचे व्हिडिओ आणि फोटो असल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी पर्यटक आणि स्थानिकांना केले. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा तपास केला जात आहे. या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता.

पहलगाम हल्ल्यासंदर्भातील चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने आतापर्यंत १०० स्थानिकांची चौकशी केली आहे. स्थानिकांकडून एनआयएने अनेक व्हिडिओ आणि फोटो जप्त केले आहेत. या व्हिडिओ आणि फोटोंची आता तपासणी केली जाणार आहे.

हल्लेखोर आणि त्यांच्या कार्यपद्धतीचे कोणतेही संभाव्य संकेत शोधण्यासाठी एनआयएकडून विविध व्हिडिओ आणि फोटोंची सखोल तपासणी करणार आहे. “पर्यटक आणि इतरांनी, जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने काही संबंधित तपशील पाहिले, ऐकले किंवा क्लिक केले असतील जे एनआयएला काश्मीरमधील पर्यटकांवरील हल्ल्यामागील कट उलगडण्यास मदत करू शकतील, त्यांनी ते द्यावे”, असे एनआयएच्या निवेदनात म्हटले आहे.

या क्रमांकावर साधा संपर्क

“मानवतेविरुद्धच्या या भयानक गुन्ह्याच्या तपासात कोणतीही उपयुक्त माहिती किंवा पुरावे गमावले जाऊ नयेत यासाठी आता त्यांनी आपले प्रयत्न आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा सर्व लोकांना ९६-५४-९५८-८१६ आणि/किंवा ०११- २४३६८८०० वर एजन्सीला कॉल करून माहिती सामायिक करण्याचे आवाहन एनआयएने केले आहे”, असे एनआयएने म्हटले आहे.