Pahalgam Attack : महाभारतातल्या अश्वत्थाम्याची जखम जन्मोजन्मी भळभळणारी आहे. त्याच्या हातून झालेल्या पातकाची त्याला शिक्षा मिळाली ही गोष्ट आपण महाभारतात वाचली आहे. मात्र भारतातल्या पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यात मारले गेलेले सगळे पर्यटक निष्पाप होते. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. तरीही या हल्ल्याची जखम अश्वत्थाम्याच्या जखमेप्रमाणे भळभळते आहे आणि ती आठवण त्या विदारक घटनेच्या आठवणी ताज्या करते आहे. कारण या हल्लयामुळे संपूर्ण देश हादरला होता. २६ पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन चार दहशतवाद्यांनी ठार केलं. या घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमधले २० पर्यटक ठार झाले. या हल्ल्याच्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम कसा होता आपण जाणून घेऊ.

२२ एप्रिल २०२५ च्या दुपारी पहलगाम मध्ये घडलेली घटना काय होती?

काश्मीर या ठिकाणी असलेल्या पहलगाममध्ये लोक नेहमीप्रमाणे सुट्टी एंजॉय करत होते. काही जण मधुचंद्रासाठी आले होते. कुणी सुट्टी असल्याने थंड हवेचं ठिकाण काश्मीरला भेट द्यायला आले होते. पहलगामला मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं. या खास ठिकाणाचा अनुभव पर्यटक घेत होते. दोन ते अडीच्या सुमारास गोळीबाराचा आवाज येऊ लागला. त्यानंतर दहशतवाद्यांनी हल्ला केला. काय होतंय काही कळायच्या आतच एकच हलकल्लोळ माजला. दहशतवाद्यांनी गोळीबार करुन २६ जणांना ठार केलं.

Pahalgam Terror Attack News
पहलगाम या ठिकाणी जो हल्ला झाला होता त्यात देशातल्या २६ पर्यटकांना धर्म विचारुन ठार करण्यात आलं (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

गुलझार अहमद या स्थानिकाने काय सांगितलं होतं?

गुलझार अहमद नावाचा स्थानिक म्हणाला होता “आम्ही इथल्या (पहलगाम) स्टँडजवळ शांतपणे उभे होतो. काही पर्यटक वरच्या बाजूला गेले होते. अचानक आम्ही पाहिलं लोक सैरावैरा धावू लागले, त्या पाठोपाठ किंकाळ्या आणि आरडाओरडा ऐकू आला. तेव्हा हे स्पष्टच झालं की काहीतरी भयंकर घडतं आहे. नंतर काही क्षणात समजलं की हल्लेखोरांनी पर्यटकांवर गोळीबार सुरु केला आहे. त्यामुळे पर्यटक घाबरले, त्यांचा गोंधळही वाढला तो क्षण मी कधीच विसरु शकत नाही.”

नेमका हल्ला कुणी केला?

पहलगाममध्ये मागील वर्षी आलेल्या आणि हल्ल्यात अडकलेल्या पर्यटकांनी ही माहिती दिली होती की हल्ला करणारे एकूण ४ दहशतवादी होते, जे तुमचा धर्म कुठला? अशी विचारणा करुन गोळ्या झाडत होते. पर्यकांनी हेदेखील सांगितलं की चार जण आमची नावं विचारत होते आणि विचारत होते की तुम्ही हिंदू आहात का? हो म्हटल्यावर ते पुरुषांवर गोळ्या झाडत होते. महिला आणि लहान मुलांना त्यांनी काही केलं नाही. जे काही घडलं ते इतकं अचानक घडलं की कुणाला कसलाही विचार करायला वेळ मिळाला नाही. इतका भयंकर आणि मन सून्न करणारा हा हल्ला होता. आज या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे पण या घटनेच्या आठवणी ताज्या आहेत.

Pahalgam Terror Attack News
पहलगामच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)

ज्या पर्यटकांना कलमा वाचता आला नाही त्यांना सगळ्यांना ठार केलं

या हल्ल्यात जे पर्यटक अडकले होते त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा चारही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला तेव्हा तिथे असलेल्या लोकांना ते धर्म विचारत होते. तुम्ही हिंदू आहात का? हा त्यांचा प्रश्न होता. तसंच आमच्या पैकी काही लोकांना त्यांनी कलमा पठण करण्यास सांगितलं असंही हल्ल्यातून वाचलेल्या एका महिलेने सांगितलं. ज्यांना कलमा पठण करता आलं नाही किंवा ज्यांनी नकार दिला अशांवर त्यांनी गोळ्या झाडल्या आणि ठार केलं.

विनय नरवाल यांच्या मृतदेहाजवळ बसलेला त्याच्या पत्नीचा फोटो व्हायरल

पहलगाम या ठिकाणी विनय नरवाल हे नौदल अधिकारी त्यांची पत्नी हिमांशीसह मधुचंद्रासाठी आले होते. विनय नरवाल आणि हिमांशी यांचं लग्न १६ एप्रिल २०२५ ला झालं होतं. ते २१ एप्रिलला पहलगामला आले होते. २२ एप्रिलला विनय नरवाल यांना धर्म विचारुन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केलं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, त्यामुळे आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराला हिमांशी नरवाल यांनी एका क्षणात गमावलं. काहीही न सुचल्याने त्या विनय नरवाल यांच्या मृतदेहाजवळ बसून होत्या. त्यांचा हा फोटो २२ एप्रिल २०२५ ला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. मन सून्न करणारा आणि काळीज पिळवटून टाकणारा फोटो आजही डोळ्यांसमोर आला की लोकांना त्या विदारक हल्ल्याची आणि दहशतवाद्यांच्या क्रूर कृत्याची नकोशी आठवण येतेच.

Pahalgam Attack News
हिमांशी नरवाल यांचा फोटो त्या दिवशी व्हायरल झाला होता. विनय नरवाल यांना दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केलं होतं. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

लष्कर-ए-तैयब्बाकडून झाला होता हल्ला

२६ निष्पाप पर्यटकांना चार दहशतवाद्यांनी धर्म आणि नावं विचारुन ठार केलं. या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दहशतवाद्यांची रेखाचित्रं समोर आली होती. हे सगळे दहशतवादी लष्कर ए तैयब्बा या संस्थेशी निगडीत असलेल्या द रेझिस्टंन्स फ्रंट या संघटनेने या हल्ल्याची जबाबादारी घेतली. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हा पूर्वनियोजित कट होता. दहशतवाद्यांनी कुठे पर्यटक जास्त प्रमाणात असतात हे पाहून हा कट आखला होता. पर्यटकांची गर्दी होते आहे का? याची ते शांतपणे वाट बघत होते आणि त्यानंतर त्यांनी भारतीय पर्यटकांवर हा हल्ला केला. या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण त्या आठवणी आजही काळजात घर करुन राहिल्या आहेत यात शंका नाही. या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.