पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने आखलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान शहीद झालेल्या सहा सैनिकांची नावे राष्ट्रीय यद्ध स्मारकात कोरण्यात आली आहेत. शहीदांमध्ये लष्कराच्या पाच सैनिकांसह हवाई दलाच्या एका सैनिकाचा समावेश आहे. शहीद सैनिकांना श्रद्धांंजली म्हणून त्यांची नावे इंडिया गेट परिसरातील राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरली जातात. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत विविध मोहिमा आणि युद्धांमध्ये शहीद झालेल्या सैनिकांची नावे या स्मारकात आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शहीद झालेल्या सैनिकांची नावे प्रथमच जाहीर करण्यात आली आहेत. शहीद सैनिकांची नावे अलीकडेच कोरल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुभेदार मेजर पवन कुमार, रायफलमॅन सुनील कुमार, लान्स नाईक दिनेश कुमार, अग्निवीर मूद मुरलीनायक, हवालदार सुनील कुमार सिंह आणि हवाई दलाचे सार्जंट सुरेंद्र कुमार अशी या शहीद सैनिकांची नावे आहेत. त्यांच्या नावाबरोबरच त्यांच्या तुकडीचीही नावे कोरण्यात आली आहेत.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २२ एप्रिलला केलेल्या हल्ल्यामध्ये २६ जण मारले गेले होते. मृतांमध्ये बहुसंख्य पर्यटकांचा समावेश होता. यानंतर पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याने ‘ऑपेरशन सिंदूर’ मोहीम आखली. त्याअंतर्गत ७ मे रोजी सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर ल्ष्यियत हल्ले केले.
एका वर्षाच्या विलंबाबद्दल काँग्रेसची टीका
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शहीद झालेल्या सहा सैनिकांची नावे एका वर्षाच्या विलंबानंतर जाहीर केल्याबद्दल काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, ‘‘स्वत:भोवती राष्ट्रवादाची शाल ओढलेल्या सरकारने या शूर नायकांच्या हौतात्म्याला मान्यता द्यायला एक वर्षाचा विलंब केला आहे, ही शरमेची बाब आहे.’’ हे सैनिक भारताचे शूर पुत्र होते, त्यांनी देशाच्या सन्मानाचे संरक्षण करताना आपले आयुष्य वेचले. ‘‘त्यांची नावे आपल्या राष्ट्रीय चेतनेत कोरली जायला हवी होती. या कृतज्ञ देशाने त्यांच्या त्यागाचा सन्मान केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना दिसायला हवे होते. प्रत्यक्षात एक संपूर्ण वर्ष भाजप सरकारने त्यांचे हौतात्म्य देशापासून लपवून ठेवण्याचा पर्याय निवडला,’’ अशी टीका खेरा यांनी केली.
