India Pakistan War Tension Updates: पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यावर भारतासह जगभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भारतानं संयुक्त राष्ट्राच्या बैठकीतही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर निर्बंधदेखील घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे पहलगाम हल्ल्याच्या नव्या व्हिडीओमुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. एका झिपलाईन ऑपरेटरनं ‘अल्लाहू अकबर’ म्हटल्यामुळे त्याचा संबंध दहशतवाद्यांशी जोडला गेला आहे. त्याच्या वडिलांनी यावर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

नेमका व्हिडीओ काय आहे?

पहलगाम हल्ल्याच्या वेळचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पर्यटक झिपलाईनवर जात असताना त्याला सोडणारा ऑपरेटर ‘अल्लाहू अकबर’ म्हणत असल्याचं दिसत आहे. नेमका तेव्हाच मागून गोळीबाराचा आवाज येत आहे. या झिपलाईन ऑपरेटरचं नाव मुझम्मील असून तो काश्मीरचा स्थानिक रहिवासी आहे. मुजम्मील गोळ्यांचे आवाज आल्यानंतर अल्लाहू अकबर म्हणाला, असा आरोप केला जात असून त्यामुळे मुजम्मीलचे वडिल व्यथित झाले आहेत.

मुजम्मीलच्या वडिलांनी टीव्ही ९ शी बोलताना आपली व्यथा मांडली आहे. “काहीही संकट आलं तर आम्ही अल्लाहू अकबर म्हणतो. आम्ही कुठे पडलो तरीदेखील अल्लाहू अकबर म्हणतो. मुजम्मील त्या पर्यटकाला झिपलाईनवर सोडताना अल्लाहू अकबर म्हटला जेणेकरून त्यातून आम्ही सांगतो की सगळं व्यवस्थित होईल. आम्ही रोज प्रत्येक पर्यटकाला सोडताना अल्लाहू अकबर म्हणतो”, असं मुजम्मीलचे वडील यावर म्हणाले.

“मुझम्मील घरी आला आणि बेशुद्ध पडला”

दरम्यान, घरी परतल्यानंतर मुझम्मील बेशुद्ध पडल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. “घरी आल्यानंतर त्यानं काहीच सांगितलं नाही. खोलीत गेला, रडायला लागला आणि बेशुद्ध झाला. कदाचित त्यानं तिथला गोळीबार स्वत: पाहिला असेल”, असं ते म्हणाले.

“दोन दिवसांपूर्वी मुजम्मीलला घेऊन पोलीस निघून गेले. मुजम्मीलला ते कधी सोडणार हे माहिती नाही. त्यांनी त्याला लवकर सोडलं तर आमच्यावर मोठी कृपा होईल. मुजम्मीलचा या सगळ्या प्रकरणात काहीच संबंध नाही. त्याची काहीही चूक झालेली नाही. तुम्ही सांगाल तिथे मी लिहून देईन. त्यानं काहीही चुकीचं केलेलं नाही”, अशा शब्दांत त्यांनी मुलगा निरपराध असल्याचं सांगितलं.

“मी आता म्हातारा झालोय”

दरम्यान, मुझम्मील एकटाच घरात कमावता असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. “मुजम्मील हे झिपलाईन ऑपरेटरचं काम तीन वर्षांपासून करतो. तो नववीपर्यंत शिकला आहे. त्याला अटक झाली तर फार अवघड होईल. तोच घरातला कमावता आहे. मी आता म्हातारा झालोय. काम करू शकत नाही”, अशा शब्दांत मुजम्मीलच्या वडिलांनी त्यांच्या व्यथा बोलून दाखवल्या.