Pahalgam Terrorist Attack investigation: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तपासात अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांनी वापरलेल्या दोन मोबाईल फोन्सपैकी एका फोनचे ‘कराची कनेक्शन’ समोर आले असून, पाकिस्तानमधील एका बड्या बँकेची भूमिका आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) रडारवर आली आहे. दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्या या जागतिक नेटवर्कचा पर्दाफाश भारतीय यंत्रणांनी केला आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी वापरलेला एक मोबाईल २०२१ मध्ये पाकिस्तानात आयात केलेल्या एका मोठ्या कटाचा भाग होता. विशेष म्हणजे, या आयातीसाठी कराचीतील एका नामांकित बँकेने वित्तपुरवठा केला होता. या बँकेचे नाव यापूर्वीही लष्कर-ए-तैयबा सारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याप्रकरणी सुरक्षा यंत्रणांच्या तपासात समोर आले आहे.
तीन वर्षे फोन ‘नॉट रीचेबल’; थेट हल्ल्याच्या वेळीच झाले सुरू!
सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेले दोन्ही मोबाईल अनुक्रमे २०२१ आणि २०२३ मध्ये पाकिस्तानात आयात करण्यात आले होते. मात्र, २०२५ मधील पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधीपर्यंत हे दोन्ही फोन कधीही सुरू करण्यात आले नव्हते. केवळ दहशतवादी कारवायांसाठीच हे फोन अत्यंत गोपनीयरीत्या साठवून ठेवण्यात आले होते, असा संशय यावरून बळावला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या तपासात समोर आले आहे की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे शाओमी कंपनीचे दोन ‘रेडमी’ सिरीजचे मोबाईल होते. यात २०२१ मधील ‘रेडमी ९टी’ आणि २०२३ मधील ‘रेडमी नोट १२’ या मॉडेल्सचा समावेश होता.
गेल्या वर्षी २८ जुलै २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या दाचिगाम जंगलातील मुलनार महादेव येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी फैसल जट्ट ऊर्फ सुलेमान शाह, हबीब ताहीर ऊर्फ जिब्रान आणि हमझा अफगाणी या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या मृत दहशतवाद्यांच्या मृतदेहांची झडती घेतली असता हे मोबाईल जप्त करण्यात आले होते.
शाओमीच्या जागतिक तपासातून ‘फैसल बँक’ कनेक्शन उघड
भारतीय तपास यंत्रणांनी ‘शाओमी ग्लोबल’ या मोबाईल कंपनीशी संपर्क साधून या फोनचा आंतरराष्ट्रीय प्रवास तपासला. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. ‘रेडमी ९टी’ हा फोन ‘टेक सिरत प्रायव्हेट लिमिटेड’ या पाकिस्तानी कंपनीने आयात केलेल्या स्टॉकचा भाग होता. या कंपनीचे कार्यालय कराचीतील क्लिफ्टन रोडवर आहे.
कंपनीच्या कागदपत्रांनुसार, हा स्टॉक १ जानेवारी २०२१ रोजी पाकिस्तानात पोहोचला होता. या मालाची वाहतूक आणि वितरणाची जबाबदारी ‘फैसल बँक’ सांभाळत होती. वितरणाचा पत्ता ‘फैसल हाऊस, मुख्य शाखा, शाहराह-ए-फैसल, कराची, पाकिस्तान’ असा नोंदवला गेला होता. हा पत्ता पाकिस्तानमधील एका अग्रगण्य बँकेचा म्हणजेच ‘फैसल बँक लिमिटेड’चा अधिकृत पत्ता आहे.
तपास अधिकाऱ्यांचा दावा
“बँकेने आयातदार कंपनीला वित्तपुरवठा केल्यामुळे कागदपत्रांवर बँकेचा पत्ता होता. ही एक सामान्य व्यावसायिक प्रक्रिया असली, तरी याच साठ्यातून हा विशिष्ट फोन चोरून किंवा छुप्या मार्गाने ‘लष्कर-ए-तैयबा’पर्यंत पोहोचवला गेला. २०२१ पासून हा फोन एकदाही सुरू झाला नव्हता. याचा अर्थ स्पष्ट आहे की, दहशतवादी हल्ल्याच्या वेळीच वापरण्याच्या हेतूने हा फोन बाजूला काढून सुरक्षित ठेवण्यात आला होता.”
फैसल बँकेचा जुना ‘दहशतवादी’ इतिहास
पहलगाम हल्ल्यात फैसल बँकेचा थेट सहभाग असल्याचा कोणताही थेट पुरावा अद्याप मिळालेला नसला, तरी या बँकेचा पूर्वेतिहास अत्यंत वादग्रस्त राहिला आहे.
- २००७ चा न्यूयॉर्क टाईम्सचा अहवाल: अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दाखल झालेल्या खटल्यांमध्ये असे समोर आले होते की, अमेरिकेने दहशतवादी घोषित केलेल्या पाकिस्तानमधील दोन कट्टरपंथी संघटनांची खाती फैसल बँकेत होती. यामध्ये भारताच्या विरोधात कारवाया करणारी ‘लष्कर-ए-तैयबा’ आणि अल-कायदाशी संबंधित कुवेतमधील ‘लाजनात अल-दावा’ या संस्थेचा समावेश होता.
- २००२ चा ‘डॉन’ वृत्तपत्राचा अहवाल: ९/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या ‘फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ने (FIA) लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल-मुजाहिद्दीन आणि सिपह-ए-सहाबा सारख्या बंदी घातलेल्या संघटनांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू केली होती. त्यावेळी या दहशतवादी संघटनांची देशांतर्गत आणि परदेशी चलनाची खाती हबीब बँक, नॅशनल बँक आणि फैसल बँकेत असल्याचे उघड झाले होते.
तथापि, बँकेच्या मुख्य कंपनीच्या वकिलांनी नेहमीच हे आरोप फेटाळले असून, संघटनांवर बंदी येताच किंवा त्यांचे नाव संशयित यादीत येताच खाती गोठवण्यात आली होती, असा दावा केला आहे.
दुसरा फोन लाहोरमधून; सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर
दहशतवाद्यांकडे सापडलेला दुसरा फोन ‘रेडमी नोट १२’ हा लाहोरमधील ‘एअर लिंक कम्युनिकेशन्स लिमिटेड’ या कंपनीने आयात केला होता. हा फोनही हल्ल्याच्या वेळेस थेट सुरू करण्यात आला.
इंटरनेटशिवाय संवाद: तपास यंत्रणांना या फोन्समधून कोणताही कॉल डेटा किंवा चॅटिंग संदेश मिळालेले नाहीत. कारण हे दहशतवादी संवादासाठी सेल्युलर नेटवर्क किंवा इंटरनेटचा वापर करत नव्हते. ते ‘लाँग रेंज रेडिओ कम्युनिशन’ चा वापर करत होते, जे ट्रॅक करणे अत्यंत कठीण असते.
दहशतवाद्यांचे गुप्त तंबू आणि हल्ल्याचे नकाशे जप्त
कॉल डेटा मिळाला नसला तरी, एनआयएने (NIA) या मोबाईलमधून अत्यंत संवेदनशील फोटो आणि नकाशे हस्तगत केले आहेत. यात पहलगाममधील प्रसिद्ध ‘बायसरन मेडोज’ आणि आजूबाजूच्या परिसराचे सविस्तर नकाशे आहेत.
यातील एका फोटोमध्ये दहशतवाद्यांनी ३० मार्च २०२५ रोजी (हल्ल्याच्या काही आठवडे आधी) एका उंचावर उभारलेला गुप्त तंबू दिसत आहे. या तंबूत एक शेगडी देखील दिसत असून, उंचावर ठाण मांडल्यामुळे दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे झाले होते. या दुर्गम भागात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी पुढे जाऊन २६ निष्पाप नागरिकांचा बळी घेणारा भीषण हल्ला घडवून आणला होता. भारतीय सुरक्षा यंत्रणा आता या ‘कराची कनेक्शन’च्या मुळाशी जाऊन दहशतवाद्यांच्या या आंतरराष्ट्रीय नेटवर्कला उद्ध्वस्त करण्यासाठी तपास अधिक तीव्र करत आहेत.
