पीटीआय, श्रीनगर
गेल्या वर्षीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाम पुन्हा पर्यटकांनी गजबजले असून काश्मीर खोर्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. वाढलेली सुरक्षा आणि पर्यटन स्थळे पुन्हा सुरू झाल्यामुळे पर्यटकांचा आत्मविश्वास वाढला असून, ते मोठ्या संख्येने दाखल होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसारण येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला, ज्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमधून पर्यटकांचे मोठ्या प्रमाणावर पलायन झाले. या घटनेनंतर, जम्मू आणि काश्मीरमधील अनेक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्यात आली होती. नंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन, टप्प्याटप्प्याने त्यातील काही स्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.
आता वर्षभरानंतर पहलगामची ती प्रसिद्ध कुरणे पुन्हा पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. अनंतनाग जिल्ह्यातील या ‘मिनी स्वित्झर्लंड’वर गेल्या वर्षीच्या दहशतवादी हल्ल्याची सावली आता दूर होत असल्याचे चित्र आहे.
सुरक्षा व्यवस्था अतिशय उत्कृष्ट…
आम्ही मनाली, गंगटोक आणि ईशान्य भारताच्या दौर्यावर गेलो होतो; पण येथे इतकी मोकळी मैदाने असतील, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. येथील सुरक्षा व्यवस्था अतिशय उत्कृष्ट आहे, असे छत्तीसगडहून आलेल्या आशुतोष कोसारिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
ट्युलिप गार्डनकडे पर्यटकांची पाठ?
श्रीनगर : पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या येथील ‘इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन’मध्ये यंदा पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.गेल्या वर्षी या बागेत विक्रमी ८.५५ लाख पर्यटकांनी भेट दिली होती. यावर्षी केवळ ३.९० लाख पर्यटकांनी बागेला भेट दिली, ज्यामध्ये सुमारे १,२०० परदेशी पर्यटकांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
