दिल्ली NCR मध्ये बलात्कारच्या ज्या घटना समोर आल्या आहेत त्याची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. दिल्लीत धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेली बलात्काराची घटना पाहिली तर २०१२ च्या निर्भया प्रकरणाची नकोशी आठवण ताजी होते. यावरून हा प्रश्न उपस्थित होतो की मागच्या दशकभरात कठोर कायदे लागू करण्याच्या व्यवस्थेत काही सुधारणा झाली आहे की नाही? जस्टिस जेबी पारडीवाला आणि जस्टिस के. विनोद चंद्रन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने बलात्काराच्या घटनांची दखल घेतली आहे.

जस्टिस पारडीवाला नेमकं काय म्हटलं आहे?

जस्टिस पारडीवाला म्हणाले दिल्लीत अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरने बलात्कार केला. बलात्काराच्या ही घटना पाहून २०१२ च्या निर्भया प्रकरणाची नकोशी आठवण ताजी झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांना फिरताना खासकरून महिला, मुलींना आणि लहान मुलींना फिरताना सुरक्षा प्रदान करणं ही प्रशासनाची मुख्य जबाबदारी आहे. २१ सप्टेंबरला दिल्लीतल्या कालकाजी मंदिर परिसरात असलेल्या आस्था कुंज पार्कमध्ये १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना नुकतीच घडली. पोलीस असल्याचं भासवून या मुलीवर बलात्कार करण्यात आला. या महिन्यात दिल्लीत लैंगिक छळाच्या १३ घटना समोर आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या घटनांची दखल घेतली आहे.

सन्मानाने जगणं हा प्रत्येक व्यक्तीचा मौलिक अधिकार

कोर्टाने असं म्हटलं आहे कुठल्याही हिंसेशिवाय, भीतीशिवाय सन्मानाने जगणं हा प्रत्येक व्यक्तीचा मौलिक अधिकार आहे. संविधानातील कलम २१ च्या अनुषंगाने हा अधिकार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. बागा असोत, पार्क असो, बस, मेट्रो स्टेशन, अंडरपास, फुटब्रिज अशा सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणा करून या जागा असुरक्षित होता कामा नयेत. अंधुक प्रकाश किंवा अंधार, पोलिसांची गस्त नसणं या गोष्टींमध्ये सुधारणा केली जाऊ शकते, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. या जागा म्हणजे महिला, मुलींसाठी या जागा असुरक्षित होता कामा नयेत याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे असंही कोर्टाने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

३१ ऑगस्टला समोर आलेली घटना काय?

१६ वर्षांची मुलगी ४ ऑगस्टच्या रात्री घरातून कुणालाही न सांगता नोएडा या ठिकाणी राहणाऱ्या चुलत भावला भेटण्यासाठी निघाली होती. मात्र पाऊस मोठ्या प्रमाणावर पडू लागल्याने अंधार झाला आणि तिला स्टॉप कळला नाही त्यामुळे ती ग्रेटर नोएडातील परी चौक या ठिकाणी चुकून उतरली. या मुलीला परी चौकातून पुढे जायचं होतं. तिला एक स्लीपर बस जाताना दिसली. त्या मुलीने हात केला त्यामुळे बस थांबली. बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांनी बस नोएडा सेक्टर ६३ च्या दिशेन जाते आहे असं सांगितलं. त्या मुलीला विश्वासाने बसमध्ये बसवलं. बस सुरु झाल्यानंतर काही वेळाने कंडक्टरने या मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चालक आणि कंडक्टर या दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

कालकाजी मंदिर परिसरात घडलेली घटना काय?

दिल्लीत १७ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना २१ सप्टेंबरला घडली. पोलीस असल्याचं भासवून या मुलीवर बलात्कार करण्यात आला. १७ वर्षांची ही पीडिता तिच्या मित्रासह कालकाजी मंदिरात आली होती. त्यावेळी तीन तरूणांनी पोलीस असल्याचं भासवून या दोघांना मंदिराजवळ असलेल्या आस्था कुंज पार्क या ठिकाणी नेलं. तिथे तरूणाला मारहाण करण्यात आली आणि अल्पवयीन तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून या मुलीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेने दिल्ली हादरली आहे.