अत्यंत वादग्रस्त विधेयक म्हणून चर्चेत असलेल्या ‘दहशतवादविरोधी’ विधेयकास पाकिस्तानी लोकप्रतिनिधीगृहाने संमती दिली आहे. या विधेयकाद्वारे दहशतवाद्यांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे अधिकार संरक्षण दलांना देण्यात आले आहेत. दहशतवाद्यांबरोबरच खुनाचा प्रयत्न किंवा आरोग्य अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांनाही दिसता क्षणी गोळ्या घालण्याची तरतूद या कायद्यात आहे.
‘प्रोटेक्शन ऑफ पाकिस्तान बिल २०१४’ या विधेयकावर पाकिस्तानी प्रतिनिधीगृहाने संमतीची मोहोर उमटवली. कनिष्ठ अधिकारी, अराजपत्रित अधिकारी, कमांडिंग ऑफिसर यांच्यापैकी कोणीही अशा स्वरूपाचे आदेश देऊ शकेल, असे या विधेयकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अशा गुन्ह्य़ांमधील संशयितांना न्यायालयीन रिमांड दिल्यानंतर तब्बल ६ दिवासांपर्यंत तुरुंगात डांबून ठेवता येईल, असेही हा कायदा सांगतो.
वैशिष्टय़े
*कोणत्याही न्यायालयीन पूर्वपरवानगीविना सर्च ऑपरेशन करण्याचा अधिकार
*दोषी ठरलल्यांना २० वर्षे कारावासाची शिक्षा
*कालमर्यादा दोन वर्षे
*उत्तर वजिरिस्तान प्रांतातील दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी उपयुक्त
*न्यायालयीन अधिकारक्षेत्रात संरक्षण दलांकडून हत्या झाल्यास न्यायालयीन चौकशी