यंदाचा ईद उद अझाचा सण काश्मीरमध्ये बलिदान करणाऱ्या काश्मिरी लोकांना अर्पण करीत असून त्यांचा आवाज बळाने दडपता येणार नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे. काश्मीरप्रश्नी त्यांनी पुन्हा भारताला लक्ष्य केले आहे. काश्मिरी लोकांचे बलिदान आपण विसरू शकत नाही. त्यांच्या या लढय़ाला यश येईल. या वेळचा ईदचा सण आपण बलिदान करणाऱ्या काश्मिरी लोकांना समर्पित करीत आहोत. काश्मीर प्रश्न जोपर्यंत लोकांच्या इच्छेनुसार सोडवला जात नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असे शरीफ म्हणाले.

शरीफ यांनी रायविंड येथील त्यांच्या निवासस्थानी असलेल्या मशिदीत कुटुंबीयांसह नमाज पठण केले. काश्मिरी लोकांची तिसरी पिढी आता भारतापासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढत आहे. स्वयंनिर्णयाच्या हक्कासाठी त्यांची लढाई असून, त्यांचा आवाज बळाने दडपता येणार नाही. अध्यक्ष ममनून हुसेन यांनी सांगितले, की पाकिस्तानने आपल्या काश्मिरी बंधू-भगिनींना विसरू नये कारण ते दहशतवादाला तोंड देत आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. काश्मीर लोकांना त्यांच्या लढय़ाचे फळ मिळण्याचा दिवस आता दूर नाही. ते आता मुक्तभूमीत त्यांचे सण साजरे करतील. दरम्यान, जमात उद दवाचा प्रमुख व मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने ईदच्या नमाजावेळी सांगितले, की भारतीय दलांशी लढणाऱ्या काश्मिरी लोकांना यश येईल यात शंका नाही. नवाझ शरीफ सरकारने काश्मीरबाबत ठोस भूमिका घेऊन लोकांना स्वातंत्र्यासाठी मदत केली पाहिजे. शरीफ यांनी काश्मीर प्रश्न जागतिक मंचावर मांडण्यासाठी २२ संसद सदस्यांची दूत म्हणून नेमणूक केली होती.