मुशर्रफ यांच्या पुस्तकातील उताऱ्यांची पाकिस्तानच्या न्यायालयाकडून मागणी

अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातून शेकडो व्यक्ती ताब्यात घेऊन त्यांनी परकीय शक्तींच्या हवाली

अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातून शेकडो व्यक्ती ताब्यात घेऊन त्यांनी परकीय शक्तींच्या हवाली करण्यासंबंधी माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या ‘इन द लाइन ऑफफायर’ या आत्मचरित्रातील उतारे उपलब्ध करून द्यावेत, असा आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मुशर्रफ यांच्या पुस्तकातील उताऱ्यांच्या साहाय्याने या संदर्भातील तपासकामास उपयोग व्हावा, या हेतूने सदर आदेश देण्यात आला आहे.
९/११ च्या हल्ल्यानंतर सुमारे चार हजार लोक पाकिस्तानातून गायब झाले असल्याचा आरोप मानवी हक्क संघटनेने केला असून त्याबद्दल मुशर्रफ यांच्याविरोधात खटला घातला जाऊ शकतो, असे या संघटनेने म्हटले आहे.
मुशर्रफ यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत सदर उल्लेख करण्यात आला असून काही पाकिस्तानी नागरिक अमेरिकेच्या स्वाधीन करण्यात आले होते, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले असल्याची माहिती न्या. जव्वाद एस. ख्वाजा यांनी दिली.
 या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्तीतील मजकुराची छाननी करून योग्य उतारे आपल्याला द्यावेत, असे आदेश अतिरिक्त अ‍ॅटर्नी जनरल तारिक खोखार यांना न्यायालयाने दिले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना एखाद्या परकीय देशास हवाली करण्यात आल्याची बाब सदर पुस्तकावरून सिद्ध झाली तर मुशर्रफ यांच्यावरील खटल्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज एका ज्येष्ठ कायदा अधिकाऱ्याने व्यक्त केला. येथील ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने यासंबंधी वृत्त दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pak sc seeks excerpts from musharrafs book in missing person case