रॉ म्हणजे रीसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग या भारतीय गुप्तचर खात्याच्या एका कथित अधिकाऱ्यास पाकिस्तानने अटक केली असून, या प्रकरणी भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांना बोलावून पाकिस्तानने निषेध नोंदवला आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी रॉ या संस्थेच्या अधिकाऱ्यास काल अटक केल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी बंबवाले यांना पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी बोलावून घेतले व निषेध खलिता त्यांच्या हाती ठेवला. दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की अटक करण्यात आलेल्या व्यक्तीशी सरकारचा काही संबंध नाही, ती व्यक्ती नौदलातून मुदतीपूर्वीच निवृत्ती घेतलेली आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्यात भारताला अजिबात स्वारस्य नाही.
रॉ या संस्थेचा अधिकारी बेकायदेशीररीत्या पाकिस्तानात आला व त्याने बलुचिस्तान व कराचीत विध्वंसक कारवाया केल्या असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर सरफराज बुगटी यांनी गुरुवारी सांगितले, की या भारतीय अधिकाऱ्याचे नाव कुल यादव भूषण असे असून, तो कमांिडग ऑफि सर दर्जाचा नौदलातील अधिकारी आहे व तो रॉ या संस्थेसाठी काम करीत होता. बुगटी यांनी असा दावा केला, की भूषण हा बलुचिस्तानातील फुटीरतावाद्यांच्या कारवायांना खतपाणी घालत होता. मंत्र्यांनी सांगितले, की त्याला कुठे अटक करण्यात आली हे सांगता येणार नाही. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बलुचिस्तानातील चमन भागात या अधिकाऱ्यास अफगाणिस्तान सीमेवर अटक करण्यात आली आहे.