पाकिस्तानच्या वायव्य भागात शनिवारी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. येथील कुर्रम एजन्सीच्या ईदगाह बाजारात हा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुर्रम एजन्सीचे हे प्रशासकीय मुख्यालय अफगाणिस्तानच्या सीमेपासून नजीकच्या अंतरावर आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटके ही भाज्यांच्या क्रेटमध्ये ठेवण्यात आली होती. भाज्यांचा लिलाव सुरू असताना हा स्फोट झाला. यावेळी बाजारात गर्दी असल्यामुळे स्फोट झाल्यानंतर १५ लोकांचा मृत्यू झाला. तर ३० जण जखमी झाले आहेत. या जखमींना पराचिनार मुख्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या स्फोटानंतर सुरक्षा दलांनी याठिकाणी धाव घेतली असून हा परिसर खाली करण्यात आला आहे. सध्या सुरक्षा दलांकडून या परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या तीन प्रांताच्या सीमेला लागून असल्यामुळे कुर्रम हा परिसर अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. या भागातून दहशतवादी प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये घुसखोरी करतात.