आमच्या सदिच्छात्मक प्रस्तावाला चांगला प्रतिसाद देण्याऐवजी भारत आमच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. भारतच पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना पाठिंबा देत असल्याचा उलटा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी सांगितले की, काश्मीर हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वात जुना न सुटलेला प्रश्न आहे व तो संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर आहे.

ऑरगनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन या संस्थेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या वार्षिक परिषदेत त्यांनी असा आरोप केला की, भारताने मानवी हक्कांचे व शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ओआयसीच्या सदस्य देशांनी भारताला काश्मीरमधील दडपशाही थांबवण्यास सांगून शांततामय तोडग्यासाठी वाटाघाटीला तयार होण्यास राजी करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानने मांडलेल्या शांतात प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या ऐवजी भारत पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करीत आहे तसेच पाकिस्तानात दहशतवाद पसरवित आहे. काश्मिरी लोकांना स्वयंनिर्णयाचा हक्क नाकारणे चालूच असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय त्यात काही करीत नाही ही खंत कायम आहे. भारताच्या निगराणीखाली स्वयंनिर्णयाच्या हक्कासाठी मतदान घेणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली काश्मीरमध्ये सार्वमत घ्यावे असे त्यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पाश्र्वभूमीवर ओआयसी संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. संघटनेच्या काश्मीर संपर्क गटाचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला असून त्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या ठरावानुसार जम्मू-काश्मीरमध्ये स्वयंनिर्णयाचा हक्क लागू करावा अशी मागणी केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी चार कलमी शांतता प्रस्ताव मांडला होता त्यात काश्मीरचे निर्लष्करीकरण, सियाचेनमधून बिनशर्त माघार यांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांना घणाघाती उत्तर दिले असून पाकिस्तानचा चार कलमी शांतता प्रस्ताव भारत नाकारत असून केवळ सीमेपलीकडून पसरवला जाणारा दहशतवाद थांबवला तरच चर्चा होऊ शकेल असे मत मांडले.