Pakistan Afghanistan Ceasefire News: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानने काबूलमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ४०० नागरिकांचा मृत्यू झाला. पण, पवित्र रमजान महिन्याची सांगता आणि ईदच्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही देशांनी तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. गुरुवारी पहाटेपासून सोमवार मध्यरात्रीपर्यंत पाच दिवसांसाठी ही शस्त्रसंधी लागू असेल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात देण्यात आली आहे.
इस्लामिक देशांच्या विनंतीनंतर निर्णय
पवित्र रमजान महिन्याची सांगता होत असल्याने तसेच ईदच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी संघर्ष काही दिवसांसाठी थांबवावा, अशी विनंती इस्लामिक देशांनी केली. सौदी अरेबिया, कतार आणि तुर्किये या बंधू इस्लामिक राष्ट्रांनी युद्धविराम लागू करावा अशी विनंती केली. यानंतर पाच दिवसांसाठी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे.
दोन्ही देशांचा एकमेकांना गंभीर इशारा
तात्पुरती शस्त्रसंधी लागू करण्यात आली असली तरी दोन्ही देशांनी एकमेकांना गंभीर इशारा दिला आहे. आम्ही केवळ अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सुरू असलेल्या बचावात्मक कारवायांना स्थगिती दिली आहे, असे अफगाणिस्तानचे प्रवक्ते झबिउल्ला मुजाहिद यांनी स्पष्ट केले आहे. तर, पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) माहिती देताना, पाकिस्तानने सद्भावनेतून हा पुढाकार घेतल्याचे सांगितले. मात्र, समोरुन हल्ला झाल्यास प्रत्युत्तर दिले जाईल, असे सांगितले.

गुलाम खान बॉर्डर क्रॉसिंगवर गोळीबार
युद्धविरामीची घोषणा झाली असली तरी, उत्तर वझिरीस्तानमधील गुलाम खान बॉर्डर क्रॉसिंगवर अफगाणिस्तानकडून झालेल्या गोळीबारात पाकिस्तानचे ८ सैनिक ठार झाले असून १३ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याला पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तर दिले असून सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे, असल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
का सुरु आहे संघर्ष?
अफगाणिस्तानचे तालिबान सरकार ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) यासारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे. TTP च्या मदतीने तालिबान पाकिस्तानात हल्ले करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. अफगाणिस्तानने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांत गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु असून, सीमेवर तणाव आहे.
