इस्लामाबाद/ काबूल : पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष वाढला असून पाकिस्तानने याला युद्धाचे स्वरूप दिले आहे. पाकिस्तानने काबूल, कंदाहार आणि पक्तिया या ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या २७०हून अधिक तालिबानी सैनिकांना मारल्याचा दावा केला, तर अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या ५५ सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला.

‘अफगाणिस्तानबरोबर खुले युद्ध सुरू झाले आहे, असे आम्ही मानतो,’ असे वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी शुक्रवारी केले. अफगाणिस्तानने सीमापार गोळीबार केल्याचा आरोप करून पाकिस्तानने गुरुवारी रात्री उशिरा ‘ऑपरेशन गजब लिल हक’ सुरू केल्याचे जाहीर केले. या अंतर्गत अफगाणिस्तानमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तानने हल्ले केले.

पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्लाह तरार यांनी २७० अफगाण तालिबान ठार झाल्याची, २०० हून अधिक जखमी झाल्याची माहिती दिली. अफगाणिस्तानमधील २७ लष्करी चौक्या नष्ट करण्यात आल्या असून, ९ चौक्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या ५५ सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला. तसेच पाकिस्तानी लष्कराची दोन मुख्यालये आणि १९ लष्करी चौक्या उद्ध्वस्त झाल्याची माहिती दिली. ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तानी लष्करी चौक्यांना लक्ष्य केल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. पाकिस्तानचे रणगाडे आणि मोठा शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला. आठ अफगाण सैनिकांचा यात मृत्यू, ११ जखमी झाले आहेत. पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १३ नागरिक जखमी झाल्याचा दावा अफगाणिस्तानच्या मंत्रालयाने केला.

शांततेचे आवाहन

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी तुर्कीचे परराष्ट्रमंत्री हकन फिदान आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री फैजल बिन फरहान यांच्याशी तणावाबाबत चर्चा केली. या भागात शांतता आणि स्थिरता आवश्यक असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. चीन, रशियानेही या तणावावर चिंता व्यक्त केली.

संघर्षाचे कारण काय?

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ‘पाकिस्तानने आमच्या हद्दीत घुसखोरी केली. तेथील महिला, मुलांचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे सुरक्षा दलांनी ड्युरंड सीमेवरील पक्तिया, खोस्त, नांगरहार, नुरीस्तान या भागाजवळ पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केल्याचे अफगाणिस्तानने सांगितले. त्यानंतर पाकिस्तानने युद्धाची घोषणा करत अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले.