पीटीआय, जम्मू/श्रीनगर

जम्मू काश्मीरच्या चार सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार सुरूच असून त्यास भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

जम्मू काश्मिरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात पूंछमधील १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी केली. ५९ जखमींमध्ये ४४ नागरिक पूंछमधील असल्याचे सांगण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील गावांना लक्ष्य करून पाकिस्तानी सैन्याने सर्वात तीव्र तोफखाना आणि तोफगोळ्यांचा मारा केला होता, त्या तुलनेत गुरुवारी सीमेपलीकडून गोळीबाराची तीव्रता कमी होती आणि ती फक्त चार क्षेत्रांपुरती मर्यादित होती, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

७ आणि ८ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर या भागातील नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रे आणि तोफगोळ्यांचा विनाकारण मारा केला असता भारतीय सैन्यानेही त्यास चोख प्रत्युत्तर दिले, असे संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.

रक्तदान शिबिरांचे आयोजन

गेल्या दोन दिवसांत स्वयंसेवक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली, तर जम्मू उच्च न्यायालय बार असोसिएशननेदेखील शुक्रवारी येथील जिल्हा न्यायालय संकुलात रक्तदान शिबिर आयोजित करण्याची योजना आखत असल्याचे सांगितले.

शाळा बंद, मदरसे रहिवाशांसाठी खुले

● वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जम्मू आणि पंजाब सीमेवरील जिल्ह्यांतील शाळा गुरुवारी दुसऱ्या दिवशीही बंद होत्या. जम्मू प्रदेशातील जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ या पाच सीमावर्ती जिल्ह्यांमधील सर्व शैक्षणिक संस्था गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी जारी केले.

● जम्मू क्षेत्रातील सर्व मशिदी आणि मदरशांचे दरवाजे सीमावर्ती भागातील विस्थापित रहिवाशांसाठी खुले असल्याचे मुस्लीम विद्वान मुफ्ती सगीर अहमद यांनी गुरुवारी सांगितले. सीमावर्ती भागातील रहिवाशांना स्थलांतरित करावे लागले तर आम्ही आमचे मदरसे आणि मशिदी तयार ठेवल्या आहेत. ही इस्लामची शिकवण आहे आणि आम्ही त्याचे पालन करत आहोत, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लान्स नायक शहीद

चंडीगड : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी गोळीबारात ५-फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार (३२) शहीद झाले. ते हरियाणातील पलवल जिल्ह्यातील रहिवासी होते. २०१४ मध्येच ते सैन्यदलात भरती झाले होते. त्यांचे दोन भाऊदेखील सैन्यदलात आहेत.