Pakistan Afghanistan War : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव आहे. या दोन्ही देशांत सुरू असलेला संघर्ष आता गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. यातच पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने सोमवारी अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागात हवाई हल्ला करत २८ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे.
या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष पुन्हा एकदा विकोपाला जाण्याची शक्यता आहे. कोहाटमधील पोलीस तळावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांत सीमेजवळील ठिकाणांवर लपलेल्या २८ दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.
वृत्तानुसार, पाकिस्तानच्या प्रांतातील अलिकडेच काही ठिकाणी झालेल्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनांची लपण्याची ठिकाणे आणि सुरक्षित आश्रयस्थाने लक्ष्य करून पाकिस्तानने नियोजित हवाई हल्ले केले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानने आरोप केला की पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांमुळे त्यांच्या कुनार आणि पक्तिका या पूर्व प्रांतांमध्ये तीन नागरिक ठार झाले आहेत, तर चार जण जखमी झाले आहेत. तसेच पाकिस्तानने आमच्या काही नागरी वस्त्यांनाही लक्ष्य केल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला आहे.
कोहाट हल्ल्यानंतर पाकिस्तानची कारवाई
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट येथील पोलीस तळावर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या घटनेनंतर काही दिवसांतच पाकिस्तानने हे हवाई हल्ले केले आहेत. पोलीस संकुलातील मशिदीत आत्मघातकी बॉम्बस्फोट आणि त्यानंतर झालेली चकमक अशा घटना या हल्ल्यादरम्यान घडल्या होत्या, ज्यात किमान २४ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला होता. त्यानंतर आपल्या भूभागावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानवर हल्ले केले जाऊ शकतात, असा इशारा पाकिस्तानने याआधीच दिला होता.
अफगाणिस्तान पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची शक्यता
पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यातील संघर्षाची सुरुवात काही महिन्यांपूर्वी झाली होती. पाकिस्तानच्या हल्ल्यांना आता अफगाणिस्तानकडूनही प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा अफगाणिस्तानकडून निषेध करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे.
