Pakistan Airstrikes Afghanistan hit Kabul and Afghan border:: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही शेजाऱ्यांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. पाकिस्तानने राजधानी काबूलसह अफगाणिस्तानमधील विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी हवाई हल्ले केले. यात चार लोक ठार झाले असून, १५ जण जखमी झाले आहे. अफगाण अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे.
TTP च्या दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचा दावा
तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने कंदाहार विमानतळाजवळील खासगी विमान कंपनीच्या तेल साठ्यावर बॉम्ब हल्ला केला. पाकिस्तानी लष्कराने या हल्ल्याची अधिकृत माहिती दिली नसली तरी संरक्षण विभागाशी निगडीत सूत्रांनी या हल्ल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेला दिली आहे. पाकिस्तानने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) उर्फ पाकिस्तान तालिबान संघटनेशी निगडीत दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्काराने या संघटनेच्या तळाला अचूक लक्ष्य केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
अफगाणिस्ताने फेटाळला दावा
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या दहशतवाद्यांना आसरा दिल्याचा आरोप अफगाणिस्तावर केला जातो. पाकिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांसाठी यानांच जबाबदार धरण्यात आले होते. अफगाणिस्तानकडून मात्र हे दावे फेटाळण्यात आले आहेत. अफगाणिस्तानच्या जमिनीची वापर दुसऱ्या देशावर हल्ले करण्यासाठी केला जात नाही, अशी भूमिका तालिबान सरकारने मांडली.
चार ठार, १५ जखमी
काबूलमधील नागरी वस्तीत बॉम्ब हल्ला झाल्याची माहिती काबूल पोलिस खलिल जदरान यांनी दिली आहे. यात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाले आहेत. तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हल्ल्याची माहिती दिली आहे. दक्षिणेकडील कंदाहार प्रांत तसेच पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या पक्तिया आणि पक्तिका या पूर्वेकडील प्रांतांवरही हल्ला झाला.
