Pakistan Airstrike Balochistan: पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सोराब आणि ग्वादरच्या आसपासच्या भागात केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये महिला आणि लहान मुलांसह तब्बल २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

हवाई हल्ल्यात अनेकांचा मृत्यू

हल्ल्यांनंतर लगेचच या भागातील इंटरनेट आणि दूरसंचार सेवा खंडित करण्यात आल्यामुळे, मृतांच्या अचूक आकडेवारी समोर आलेली नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने अतिरेक्यांच्या ठिकाणांऐवजी लोकवस्तीत हल्ला केल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानकडून या लष्करी कारवाईबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. हल्ल्यामुळे सोराब आणि ग्वादरमध्ये संतापाची लाट पसरली असून, स्थानिकांनी या लष्करी कारवाईचा निषेध केला आहे.

प्रत्युत्तरात बीएलएकडून हल्ला

बलुचिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागिकांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. या प्रांतात सततच्या कारवाया, लोक बेपत्ता होण्याचे आरोप आणि अभिव्यक्तीवरील बंदीमुळे तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर स्थानिकांनी निषेध व्यक्त केला असून, ‘बलुच लिबरेशन आर्मी’ देखील आक्रमक झाली आहे. प्रत्युत्तर दाखल बीएलएने केलेल्या हल्ल्यात चागाई जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या बॉम्बस्फोटात एक पोलीस ठाणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तर, तीन सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

विविध भागात हिंसाचार

खुजदार आरसीडी महामार्गावर देखील हल्ला झाला. इथं सैनिकांच्या ताफ्यावर आणि एका वाहनावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक जण ठार किंवा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगुचर बाजारपेठेतही स्फोट आणि गोळीबार झाल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले आहे.