देशाच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचं आज तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. तामिळनाडूच्या कुन्नूर भागामध्ये एका डोंगराळ परिसरात त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जनरल बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि सुरक्षा दलातील इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. या भीषण दुर्घटनेवर देशभरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. तर, पाकिस्तानने देखील या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

पाकिस्तानने बिपिन रावत यांच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तानचे चेअरमन जॉईंट चिफ्स ऑफ स्टाफ कमिटी (CJCSC) लेफ्टनंट जनरल नदीम राजा आणि चीफ ऑफ द आर्मी स्टाफ (COAS) जनरल कमर जावेद बाजवा यांनी रावत आणि अन्य अधिकाऱ्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्याने ट्विट करून याची माहिती दिली आहे. 

जनरल बिपिन रावत यांच्या निधनावर पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक; म्हणाले, “त्यांच्या निधनामुळे मी प्रचंड दु:खी झालोय”

बिपिन रावत यांच्या निधनावर देशातील सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिपिन रावत यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “जनरल बिपिन रावत हे एक अतुलनीय सैनिक होते. एक सच्चा देशभक्त. देशाचं लष्कर आणि सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. धोरणात्मक बाबींवर त्यांची मतं आणि दृष्टीकोन फार महत्त्वाचे असायचे. त्यांच्या निधनामुळे मला प्रचंड वेदना होत आहेत. ओम शांती”, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.