Red Fort Delhi Explosion Updates दिल्लीतल्या लाल किल्ला भागात i 20 कारचा स्फोट झाल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर २२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेमागे काय काय पैलू आहेत याचा शोध घेतला जातो आहे. ज्यानंतर आता कार स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर आलं आहे. पुलवामा येथील एका रहिवाशाने २९ ऑक्टोबरला ही आय २० कार खरेदी केली होती. दरम्यान या घटनेमागे आणि पाकिस्तानातील स्फोटामागे पाकिस्तानी लष्कराचा हात आहे असा दावा पाकिस्तानी पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी केला आहे.
पोलिसांनी कार स्फोटाबाबत काय सांगितलं?
पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार,ह्युंदाई कंपनीची i-20 कार या स्फोटांसाठी वापरली गेली. तर या कारचा मूळ मालक दिल्लीतला मोहम्मद सलमान हा आहे. सलमाननं आपली कार ओखला भागातील नदीमला विकली. त्यानंतर नदीमने i-20 कार ‘रॉयल कार झोन’ या डीलरला विकली. दरम्यान या कारच्या खरेदी-विक्रीत बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता असे सांगितले जात आहे. दरम्यान पाकिस्तानच्या पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी या घटनेबाबत धक्कादायक दावा केला आहे.
ताहा सिद्दीकींनी काय म्हटलं आहे?
दिल्लीत झालेल्या कार स्फोटामागे आणि इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटामागे पाकिस्तानी लष्कराचा हात आहे. दोन्ही स्फोटांमध्ये सुसाईड बॉम्बर्सचा वापर झाला. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख दहशतवादाचा वापर हा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून वापरत आहेत. त्यामुळे दक्षिण आशियात शांतता नाही तर अशांतता आहे अशी पोस्ट ताहा सिद्दीकी यांनी लिहिली आहे.
पोलिसांनी कार बाबत काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कार पहिल्यांदा अल फलाह विद्यापीठाजवळ आढळून आली. रविवारी रात्री दोनच्या सुमारास ही कार या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर सकाळी ७.३० च्या सुमारास फरिदाबाद येथील एशियन रुग्णालयाजवळ आढळून आली. त्यानंतर बद्रापूर या ठिकाणी असलेल्या टोल नाक्यावरुन सकाळी ८ वाजून ३ मिनिटांनी पुढे गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे.
उमर नावाचा दहशतवादी कार चालवत असल्याची माहिती समोर
उमर नावाचा दहशतवादी व्हाईट कॉलर मोड्युलसाठी काम करत होता आणि फरीदाबाद मधल्या अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होता. ज्या i 20 कारमध्ये स्फोट झाला ती कार डॉ. उमर चालवत होता अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. १९ ऑक्टोबरला फरिदाबाद या ठिकाणी छापेमारीही झाली होती ज्यानंतर या कारवाईला घाबरुन उमर तिथून पळाला होता आणि त्याने जागा बदलल्या होत्या अशीही माहिती पोलिसांनी दिली.
