सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये जाणारे भारतीय जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पुन्हा भारताच्या हवाली केले. आपल्या वरिष्ठांशी झालेल्या वादानंतर चंदू चव्हाण यांनी जाणूनबुजून सीमा पार केल्याचे पाकिस्तानच्या सुरूवातीच्या तपासात आढळून आले. चव्हाण यांनी कोणत्या परिस्थितीत सीमा ओलांडली याचा तपास पाकने सुरू केला होता. परंतु भारताकडून सुरूवातीपासूनच चव्हाण यांनी चुकून सीमा ओलांडल्याचे सांगत आहे. गतवर्षी २९ सप्टेंबर रोजी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याचे जाहीर केले होते. त्याच दिवशी चव्हाण हे पुंछ सेक्टर येथील आपल्या चौकीतून गायब झाले होते. इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. ड्युटीवरून चव्हाण यांचा वरिष्ठांशी वाद झाला होता. त्यानंतर ते चौकीतून गायब झाले होते. भारतीय लष्कराने १९ सप्टेंबर रोजी उरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक केला होता.
उत्तर कमांडरचे लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे, जेसीओबरोबर वाद झाल्यानंतर जवान आपल्या चौकीतून गायब असल्याची सूचना मला मिळाली होती. त्यानंतर मला आणखी एक सूचना मिळाली की जवान सीमेपार गेला आहे.

चव्हाण हे ३७ राष्ट्रीय रायफल्स मध्ये तैनात होते. या युनिटमधील जवानांची ड्युटी सीमावर्ती भागातील एलओसीवर लावण्यात येते. एका जवानाला पाकिस्तानी सीमा कुठे सुरू होते, याची माहिती नसणे असे होऊच शकत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले.
चव्हाण यांना सोडवण्यासाठी लगेचच प्रयत्न सुरू झाले होते. भारत आणि पाकिस्तानच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी हॉटलाइनवर यासंबंधी चर्चा केली होती. भारताने चव्हाण यांची सुटका होण्यासाठी तब्बल चार महिने प्रयत्न केल्यानंतर अखेर २१ जानेवारी रोजी अमृतसर येथील वाघा बॉर्डरवर त्यांना भारताच्या स्वाधीन करण्यात आले होते. चव्हाण यांनी कमांडरकडून मिळालेल्या वाईट वर्तणुकीमुळेच सीमा ओलांडल्याचे पाकिस्तानने त्यांना सोडताना म्हटले होते.
जेसीओने चव्हाण यांच्याबरोबर झालेल्या वादाची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली होती. आता चव्हाण यांची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येते. ड्युटी दरम्यान पोस्ट सोडून जाणे गुन्हा मानला जातो. यासाठी त्यांचे कोर्ट मार्शलही होऊ शकते. परंतु चंदू यांना आपली बाजू मांडण्यास संधी दिली जाईल. त्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल.