Pakistan Drone Attack on Jammu News: भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. यानंतर पाकिस्तानकडून गुरूवारीरात्री भारताच्या १५ लष्करी तळांवर हल्ल्याचे प्रयत्न करण्यात आला होता मात्र तो निष्क्रिय करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी देखील पाकिस्तानकडून जम्मू शहराला लक्ष्य करत करत ड्रोन हल्ले करण्यात आले, मात्र हे हल्ले देखील भारतीय सुरक्षा दलांनी हाणून पाडले आहेत.

जम्मू शहराला लक्ष्य करत करण्यात आलेल्या पहिल्या मोठ्या हल्ल्याच्या काही तासांनंतर पाकिस्तानकडून हा हल्ला करण्यात आला. शुक्रवारी पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आणि यामुळे पुन्हा एकदा शहरात संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आले.

सायरनचा आवाज आणि त्यापाठोपाठ स्फोट झाल्याचे आवाज पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत थोड्या-थोड्या वेळाने ऐकू येत होते. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

“पाकिस्तान सशस्त्र दलांना ८ आणि ९ मे २०२५ च्या रात्री संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांनी अनेक हल्ले केले. तसेच पाकिस्तानी लष्कराने जम्मू आणि काश्मीर येथील नियंत्रण रेषेवर अनेकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. ड्रोन हल्ले यशस्वीरित्या रोखण्यात आले आणि शस्त्रसंधी उल्लंघनांना योग्य प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्य गे देशाचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व दुष्ट योजनांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल,” असे भारतीय लष्कराने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. जम्मूच्या उपायुक्तांनी देखील सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

शुक्रवारी पहाटे झालेल्या या हल्ल्याच्या काही तास आधी भारताने जम्मू शहरावर पाकिस्तानकडून करण्यात आलेला हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला.

गुरूवारी रात्री ८ ते ८.३०च्या सुमारास पाकिस्तानने डागलेली ८ क्षेपणास्त्रे हवेत नष्ट करण्यात आली. याबरोबरच असंख्य ड्रोन देखील भारतीय संरक्षण प्रणालीकडून पाडण्यात आले. या कालावधीत देखील परिसरात संपूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आले होते.

दरम्यान पाकिस्तानच्या या हल्ल्यात शहरात लष्करातील जवान किंवा सामान्य नागरिक अशा कोणालाही कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र जम्मू प्रांतामध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळच्या भागात पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात आर्टिलरी शेलिंग करण्यात आले.

सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला.

पाकिस्तानकडून जम्मू शहराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला श्रीनगरहून जम्मू शहराकडे रवाना झाले. दरम्यान सकाळी जम्मूमध्ये परिस्थिती सामान्य झाली, दुकाने आणि बाजार पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.