पाकिस्तानमध्ये आता थेट शिक्षकांच्या पोशाखावरच अनेक अटी आणि निर्बंध टाकण्यात आले आहेत. फेडरल डायरेक्टोरेट ऑफ एज्युकेशनने (FDE) पाकिस्तानमधील महिला शिक्षकांनी जीन्स आणि घट्ट कपडे घालू नये अशी अधिसूचना जारी केली आहे. यासोबत, याच अधिसूचनेत पुरुष शिक्षकांना देखील जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास मनाई करण्यात आली आहे. डॉनच्या वृत्तानुसार, यासंदर्भातील पत्र सोमवारी (६ सप्टेंबर) शिक्षण संचालकांकडून शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना पाठविण्यात आलं आहे.

‘प्रत्येक कर्मचारी आपल्या शारीरिक स्वरूप आणि वैयक्तिक स्वच्छतेसाठी योग्य ते उपाय करत असल्याची खात्री करावी’ असं या पत्रात मुख्याध्यापकांना सांगण्यात आलं आहे. नियमित केस-दाढी कापणे, नखं कापणे, डिओडोरंट किंवा परफ्यूम वापरणं असे काही उपाय देखील सुचवण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील सर्व शिक्षकांना आता या सूचना आणि उपाययोजना त्यांच्या कार्यालयीन वेळेसह कॅम्पस आणि अधिकृत मेळावे तसेच बैठकांदरम्यान देखील पाळाव्या लागणार आहेत.

FDE च्या पात्रातील शिफारसी

FDE च्या या पत्रात अशी देखील शिफारस करण्यात आली आहे की, सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी प्रयोगशाळेत असताना टिचिंग गाउन आणि लॅब कोट घालणं आवश्यक आहे. तर यामध्ये महिला शिक्षकांना अधिकृत मेळाव्यांमध्ये/सभांमध्ये फॅन्सी कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकंच नव्हे या महिला शिक्षकांना जीन्स आणि टी-शर्ट तसेच घट्ट कपडे घालण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. याचसोबाबत शाळा आणि महाविद्यालयांतील द्वारपाल आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी देखील गणवेश सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महिला शिक्षकांचा ड्रेसकोड काय?

पत्रानुसार महिला शिक्षकांना जीन्स किंवा घट्ट कपडे घालण्याची परवानगी असणार नाही. तर त्याऐवजी त्यांना साधे सलवार कमीज, ट्राउझर, दुपट्टा/शालसहित शर्ट घालण्यास सांगण्यात आलं आहे. त्यात असंही म्हटलं गेलं आहे की, पर्दा पाळणाऱ्या महिलांना स्वच्छ आणि व्यवस्थित दिसण्यासाठी स्कार्फ/हिजाब घालण्याची परवानगी असेल. हिवाळ्याच्या काळात, महिला शिक्षकांना साध्या रंग आणि डिझाईन्सचे कोट, ब्लेझर, स्वेटर, जर्सी आणि शाल वापरता येईल.

याचसोबत, महिला शिक्षकांना एकतर फॉर्मल शूज (पंप, लोफर, म्यूल्स) किंवा स्नीकर्स आणि सँडल घालण्याची परवानगी असेल. परंतु, साधी चप्पल घालता येणार नाही.

पुरुष शिक्षकांसाठी ड्रेसकोड काय?

पाकिस्तानच्या फेडरल डायरेक्टोरेट ऑफ एज्युकेशन (FDE) च्या पत्रात म्हटलं गेलं आहे की, पुरुष शिक्षकांनी सलवार कमीजसह वेस्टकोट घालणं किंवा शर्ट-पँट आणि टाय असा पोशाख करणं अनिवार्य आहे. परंतु, जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास मनाई असेल.