जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने जिहादी गटांना काश्मीरमध्ये अधिक सक्रिय होण्याची सूचना केली आहे. ‘योग्य निर्णय घेण्यास विलंब झाल्यास पाकिस्तान काश्मीरमधील ऐतिहासिक संधी गमावून बसेल’, असे अजहरने अल-कलाममध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये म्हटले आहे. उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर मसूद अजहरने काश्मीरमधील जिहादी गटांना अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे.

पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वारंवार भारताकडून केली जाते आहे. मात्र पाकिस्तानात असणाऱ्या भारतविरोधी जिहादी गटांवर कारवाई करण्याबद्दल पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी सैन्यात मतभेद आहेत. जानेवारीत पठाणकोटमध्ये झालेला हल्ला मसूद अजहरच्या जैश ए मोहम्मदनेच घडवून आणला होता.

‘पाकिस्तान सरकारने जर थोडी हिंमत दाखवली तर काश्मीर प्रश्न आणि पाण्याची समस्या कायमस्वरुपी मिटेल. पाकिस्तानी सरकारने किमान जिहादी गटांसाठी मार्ग मोकळा करुन द्यायला हवा. मग अल्लाहची मर्जी असेल तर १९७१च्या कटू आठवणी २०१६ मध्ये पुसल्या जातील,’ असे अल कलामच्या लेखात मसूद अजहरने लिहिले आहे. अल कलाम हे जैश ए मोहम्मदचे मुखपत्र आहे.

मसूद अजहरने त्याच्या लेखातून थेट पाकिस्तानी सरकारला सल्ला दिला आहे. ‘पाकिस्तानी सरकारने जिहादी रणनितीचा अवलंब करायला हवा. १९९० मध्ये याच रणनितीचा पाकिस्तानला फायदा झाला होता. भारतीयांना अखंड भारताची निर्मिती करायची आहे. मात्र जिहादी भारतीयांचा हा मनसुबा कधीही पूर्ण होऊ देणार नाहीत. पठाणकोट आणि उरीमुळे भारतीय सैन्याच्या उणिवा जगासमोर आल्या आहेत’, असेही मसूद अजहरने म्हटले आहे.

‘भारताने यावेळी पाकिस्तानवर दबाव आणला आहे. काश्मीरमधील स्थिती पाहता हे पाऊल पाकिस्तानने उचलायला हवे होते. पाकिस्तान आमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे नियंत्रण रेषवरील शस्त्रसंधी आपण रद्द करायला हवी. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमुळे भारतीय सैन्याला मोठा धक्का बसला आहे. जिहादी कारवायांपूर्वीची पाकिस्तानमधील स्थिती आणि आताची स्थिती यामध्ये मोठा फरक आहे,’ असेदेखील मसूद अजहरने म्हटले आहे.