scorecardresearch

“राष्ट्रविरोधी” प्रोपगंडा राबवणाऱ्या पाकिस्तानातल्या ३५ YouTube चॅनेल्सवर मोदी सरकारची मोठी कारवाई

३५ युट्यूब चॅनेल्स, २ ट्विटर हँडल्स, २ इन्स्टाग्राम हँडल्स, २ वेबसाईट्स आणि एक फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं आहे.

मोदी सरकारने आज फेक न्यूज पसरवत असल्याच्या आरोपाखाली ३५ YouTube चॅनेल्स आणि अनेक सोशल मीडिया हँडल्सवर कारवाई केली आहे. राष्ट्रविरोधी माहिती प्रसारीत केल्याने ही चॅनेल्स ब्लॉक करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याआधीही गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये २० YouTube चॅनेल्सवर कारवाई केली होती.

नुकतंच माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून अशा युट्यूब चॅनेल्सवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याविषयी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं की ब्लॉक केलेल्या या युट्यूब चॅनेल्स आणि सोशल मीडिया हँडल्सचे व्ह्यूज १३० कोटींच्या आसपास होते. सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले, हे सर्व अकाऊंट्स पाकिस्तानातून चालवले जात होते. ते फेक न्यूज पसरवत होते आणि भारताविरुद्ध फेक न्यूजचं युद्ध छेडण्याचा प्रयत्न करत होते.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय म्हणाले, या युट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया हँडल्सवर झालेली कारवाई आयटी नियमांच्या अंतर्गत झाली आहे. आम्ही ३५ युट्यूब चॅनेल्स, २ ट्विटर हँडल्स, २ इन्स्टाग्राम हँडल्स, २ वेबसाईट्स आणि एक फेसबुक अकाऊंट ब्लॉक केलं आहे. हे चॅनेल्स आणि सोशल मीडिया हँडल्स राष्ट्रविरोधी प्रोपगंडा पसरवण्यासाठी वापरले जात होते. त्याचप्रमाणे फेक न्यूज पसरवून जनतेची दिशाभूल करत होते.

इंटेलिजन्स यंत्रणांकडून ही माहिती मिळाली असून तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचंही सहाय यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, या चॅनेल्सची लोकप्रियता प्रचंड होती. एक कोटीच्या वर सबस्क्राईबर्स होते तर १३० कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज होते. त्यामुळे या चॅनेल्सना ब्लॉक करणं कठीण होतं. मंत्रालयाकडून ब्लॉक करण्यात आलेले हे सगळे चॅनेल्स पाकिस्तानमधून चालवण्यात येत होते. खबर विथ फॅक्ट्स, ग्लोबल ट्रूथ, इन्फॉर्मेशन हब, अपनी दुनिया टीव्ही, बोल मीडिया टीव्ही ही ब्लॉक करण्यात आलेल्या काही युट्यूब चॅनेल्सची नावं आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pakistan based youtube channels banned in india by modi government vsk

ताज्या बातम्या