भगत सिंग यांना पाकिस्तानचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार देण्याची मागणी

भगत सिंग आमचे आदर्श

भगत सिंग

पाकिस्तानमधील एका संघटनेने शहीद-ए-आजम पुरस्कारप्राप्त शहिद भगत सिंग यांना देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘निशान-ए-हैदर’ देण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे ८६ वर्षांपूर्वी भगत सिंग यांना लाहौरमधील ज्या शादमान चौकात फाशी देण्यात आली तेथे त्यांचा पुतळा उभारावा अशीही मागणी करण्यात आली आहे. स्वतंत्रलढ्यातील क्रांतिकारांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी संबंधित संस्था काम करते. भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती.

भगत सिंग यांनी भारतीय उपमहाद्वीप स्वतंत्र होण्यासाठी प्राणांची आहुती दिल्याचे भगत सिंग मेमोरियल फाउंडेशनने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारला दिलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिन्ना यांनीही भगत सिंग यांच्याबद्दल बोलताना उपमहाद्वीपात भगत सिंगांसारखा दुसरा कोणताही शूर व्यक्ती झाला नसल्याचे गौरवोद्गार केला होता. भगत सिंग आमचे आदर्श असून त्यांचाही मेजर अजीज भट्टींसारखा सर्वोच्च शोर्य पुरस्कार निशान-ए-हैदर पुरस्कार देऊन सन्मान करायला हवा. अजीज भट्टी यांनी स्वत: भगत सिंग हे आपले आदर्श असल्याचेही या संघटनेने सरकारकडे केलेल्या अर्जात नमूद केले आहे.

लाहौरमधील ज्या शादमान चौकात भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना फाशी देण्यात आली त्या चौकात भगत सिंग यांचा पुतळा उभारून चौकाला त्यांचे नाव देण्याची मागणीही करतानाच आता या नामकरणाला पंजाब सरकारने उशीर करु नये अशी अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली आहे. आम्ही ही मागणी वारंवार करत असून यामाध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अॅड. इम्तियाज रशीद कुरैशी यांनी दिली. कुरेशी यांनी लाहोर उच्च न्यायलयामध्ये भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या संदर्भातील प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी होण्यासाठी याचिका केली आहे. हे तिघेही निर्दोष होते हे सिद्ध करण्यासाठी दाखल केलेली याचिका सध्या न्यायलयात प्रलंबित आहे.

हाफिज सईदच्या जमात-उद-दावाने शादमान चौकाला भगत सिंग यांचे नाव देण्याला विरोध केला आहे. याच प्रकरणावरून त्यांनी नामांतरणाची मागणी करणाऱ्या या संघटनेतील लोकांना धमकावल्याची माहितीही समोर येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pakistan body demands highest gallantry medal nishan e haider for bhagat singh

ताज्या बातम्या