पीटीआय, पेशावर
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये क्वेट्टातून पेशावरकडे जाणारी प्रवासी बस दरीत कोसळल्याने ४० जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात डेरा इस्माईल खान जिल्ह्यात झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस एका अवघड वळणावरून थेट दरीत कोसळली, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून बचाव तसेच मदतकार्य तातडीने राबवण्यात येत असल्याची माहिती बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांचे माध्यम सल्लागार शाहीद रिंद यांनी दिली. बचाव पथकाच्या माहितीनुसार, अपघातावेळी बसमध्ये ४८ प्रवासी होते. बस क्वेट्टाहून निघाली तेव्हा त्यात ३६ प्रवासी होते, तर उर्वरित प्रवासी वाटेत बसमध्ये चढले होते.
प्रशासनाकडून मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. खैबर पख्तुनख्वा भागात डोंगराळ भागात खराब रस्ते, वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहनांची दुरवस्था आणि विचित्र भौगोलिक स्थिती यामुळे अशा अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
