पाकिस्तानमध्ये दोन वेगवेगळे भीषण अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये एकूण ५१ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये १० लहान मुलांचा समावेश आहे. पहिला अपघात बलुचिस्तान भागात घडला. या अपघातात बस दरीत कोसळली. तर दुसऱ्या अपघातात लहान मुलांना घेऊन जाणारी बोट बुडाली.
बस पुलाच्या खांबावर आदळून दरीत कोसळली
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी भरधाव वेगाने जाणारी एक प्रवासी बस पुलाच्या खांबाला धडकून दरीत कोसळली. या अपघातात महिला तसेच मुलांसह एकूण ४२ जण ठार झाले. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस एकूण ४८ प्रवाशांना कराचीला जात होती.
दुसऱ्या अपघातात बोट बुडाली, १० मुलांचा मृत्यू
तर दुसऱ्या अपघातात लहान मुलांना घेऊन जाणारी बोट बुडाली. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवाला या भागातील कोहाट जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या अपघातात एकू १० मुलांचा मृत्यू झाला आहे. तर ८ मुले बेपत्ता होते. अपघातातील ७ जखमी मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कोहाट जिल्ह्यातील तांडा तलावाजवळ एकूण ५० विद्यार्थी सहलीसाठी जमा झाले होते.