PM Narendra Modi in Bikaner: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बिकानेर येथील जाहीर सभेत बोलत असताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर जोरदार टीका केली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “पहलगाम येथे निष्पापांवर गोळ्या झाडल्या गेल्या. पण त्या गोळ्या १४० कोटी भारतीयांना लागल्या. यानंतर प्रत्येक नागरिकाने संकल्प केला होता की, दहशतवादाला मातीत गाडले जावे. आम्ही सैन्याच्या तीनही दलाला मोकळीक दिली. तीनही दलांनी असे चक्रव्यूह रचले की पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले.” तसेच मोदींच्या धमन्यांत रक्त नाही तर गरम सिंदूर वाहतो, असेही पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

सिंदूर जेव्हा तोफगोळा बनते

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, २२ तारखेच्या पहलगामवरील हल्ल्याच्या प्रत्युत्तरात आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणांना उध्वस्त केले. जेव्हा सिंदूर तोफगोळा होतो तेव्हा काय परिणाम साधतो, हे आता जगाने आणि देशाच्या शत्रुनेही पाहिले आहे.

“एअर स्ट्राईकनंतर मी इथे आलो होतो तेव्हाच म्हणालो होतो की, या मातीची शपथ आहे, देशाची मान मी झुकू देणार नाही. आज राजस्थानच्या भूमीमधून देशातील नागरिकांना नम्रपणे सांगू इच्छितो की, जे लोक कुंकू (सिंदूर) पुसायला निघाले होते. त्यांना आम्ही मातीत गाडले. जे भारताचे रक्त सांडत होते, त्यांच्याकडून रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेतला आहे”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “भारत शांत राहिल, असा जे विचार करत होते, आज ते घरात लपून बसले आहेत. जे स्वतःच्या शस्त्रावर गर्व करत होते, ते आज कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.”

राजस्थानच्या बिकानेर येथे पंतप्रधान मोदींनी भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकास केलेल्या देशनोके स्थानकाचे उद्घाटन केले. देशभरात १,३०० हून अधिक रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार असून या उपक्रमाचा हा एक भाग आहे.

मोदीच्या धमन्यात रक्त नाही गरम सिंदूर वाहते

पाकिस्तानवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पाकिस्तान भारताशी थेट लढाई कधीच जिंकू शकत नाही. जेव्हा जेव्हा थेट लढाई झाली, तेव्हा तेव्हा ते तोंडावर आपटले. यासाठीच ते भारताविरोधात दहशतवादाचा शस्त्राप्रमाणे वापर करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“स्वातंत्र्यप्राप्तीपासून कित्येक दशके हेच सुरू होते. पाकिस्तान दहशतवाद पसरवून निर्दोष लोकांचे बळी घेत होता. पण पाकिस्तान हे विसरला की, भारताचा सेवक इथे छातीठोकपणे उभा आहे. माझे मस्तिष्क शांत असले तरी रक्त उसळत आहे. आता तर माझ्या धमन्यातून रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.