जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यानंतर काश्मीरमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. भारत सरकारने काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. भारत सरकारच्या या निर्णयावर पाकिस्तानमधून अनेक प्रतिक्रीया येत आहेत. पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत भारताच्या या निर्णयाचा निषेध केला. याचसोबत पाक क्रिकेटपटूंपासून कलाकारही भारतावर टीकेची झोड उठवत आहेत. यामध्ये आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमदची भर पडली आहे.

“माझ्या काश्मिरी बांधवांसाठी मी अल्लाकडे प्रार्थना करेन, ते सध्या खूप कठोर प्रसंगातून जात आहेत. आम्ही त्यांचं दुःख समजू शकतो. प्रत्येक पाकिस्तानी नागरिक काश्मिरी जनतेच्या लढ्यात त्यांच्यासोबत उभा आहे.” IANS वृत्तसंस्थेशी बोलत असताना सरफराजने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.

सरफराजच्या आधी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर ३७० कलम हटवण्याच्या निर्णयावर टीका केली होती. भारताविरोधात पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांपर्यंत धाव घेतली आहे, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तानच्या हाती निराशाच लागलेली आहे.