Pakistan Car Blast : पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. एका वाहनात हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. या स्फोटाच्या घटनेला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आत्मघातकी हल्ला म्हटल्याचं सांगितलं जात आहे.
इस्लामाबादमधील एका न्यायालयीन संकुलाजवळ मंगळवारी उभ्या असलेल्या एका कारमध्ये अचानक भीषण स्फोट झाला आणि मोठ्या प्रमाणात आग लागली. या शक्तिशाली स्फोटात किमान १२ जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या नागरिकांवर रुग्णालायत उपचार सुरू असून या घटनेत बहुतेक जण वकील होते. या स्फोटाच्या घटनेनंतर त्या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, हा स्फोट पार्क केलेल्या वाहनांमध्ये झाला आहे. मात्र, याला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आत्मघातकी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. या स्फोटाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इस्लामाबाद जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कामकाजाच्या वेळेत दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या वकिलांसह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आणि मोठा गोंधळ निर्माण झाला.
इस्लामाबादमधील या भीषण स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की तब्बल सहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही गाड्यांना आग लागलेलं दिसून येत असून वाहनातून मोठ्या प्रमाणात ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत आहेत. तसेच स्फोटाची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी जवळच उभ्या असलेल्या अनेक वाहनांचं नुकसान झाल्याचंही वृत्तात म्हटलं आहे.
