Pakistan Chair IMF World Bank 2027 : पाकिस्तानची २०२७ साठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँक समूहाच्या गव्हर्नर्स मंडळाच्या आगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. १९५३ नंतर प्रथमच पाकिस्तानला हे पद मिळणार असल्याची माहिती देशाच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) दिली. थायलंडमधील बँकॉक येथे सुरू असलेल्या २०२६ च्या आयएमएफ-जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीच्या पूर्ण सत्रात पाकिस्तानचे आर्थिक व्यवहार मंत्री आणि जागतिक बँकेतील पाकिस्तानचे गव्हर्नर अहद खान चीमा यांची आगामी अध्यक्ष म्हणून औपचारिक घोषणा करण्यात आली. दरम्यान, आयएमएफकडून सर्वाधिक कर्ज घेणाऱ्या देशाकडेच अध्यक्षपद दिल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच, पाकिस्तानने नुकतंच १.२ अब्ज डॉलरचे आर्थिक सहाय्य आयएमएफकडून मागितलं आहे.
पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने या नियुक्तीचं वर्णन ऐतिहासिक टप्पा असं केलं आहे. या पदामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि विकासाशी संबंधित चर्चांमध्ये सहभागी होण्याची, तसंच सदस्य देशांमधील संवादाला चालना देण्याची संधी पाकिस्तानला मिळेल, असं मंत्रालयाने म्हटलं आहे. घोषणेनंतर चीमा यांना जागतिक बँक समूहाच्या कॉर्पोरेट सचिवालयाकडून अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देण्यात आली. तसंच त्यांनी संस्थेच्या उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट सचिव आराधना कुमार-कपूर यांची भेट घेऊन पाकिस्तानच्या कार्यकाळातील समन्वयाबाबत चर्चा केली.
चीमा यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होणारे पॅराग्वेच्या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष कार्लोस कार्व्हालो स्पाल्डिंग यांच्याशीही चर्चा केली. या वेळी पदाच्या जबाबदाऱ्या आणि आगामी वर्षातील प्राधान्यक्रमांवर विचारविनिमय करण्यात आला. विकसनशील देशांचं प्रतिनिधित्व अधिक बळकट करणं, विकासासाठी निधी उपलब्ध होण्याची प्रक्रिया सुलभ करणं आणि बहुपक्षीय वित्तीय संस्थांमधील समन्वय वाढवणं आवश्यक असल्याचं चीमा यांनी अधोरेखित केल्याचं मंत्रालयाने सांगितलं.
अध्यक्षपदाची नेमकी भूमिका काय?
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेची गव्हर्नर्स मंडळे ही या संस्थांची सर्वोच्च निर्णयप्रक्रिया करणारी मंडळे आहेत. प्रत्येक सदस्य देशाचे प्रतिनिधित्व त्यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले गव्हर्नर करतात. हे प्रतिनिधी सामान्यतः अर्थमंत्री किंवा मध्यवर्ती बँकेचे प्रमुख असतात. जागतिक बँकेत बहुतांश अधिकार कार्यकारी संचालकांकडे सोपवण्यात आले आहेत. हे संचालक संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवतात. संस्थेच्या नियमांनुसार, वार्षिक बैठकीत अध्यक्षांची निवड केली जाते आणि पुढील वर्षीची वार्षिक बैठक संपेपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतात. पाकिस्तानची या पदावर नियुक्ती अशा वेळी झाली आहे, जेव्हा देश आर्थिक सुधारणा राबवण्यासाठी आणि हवामान बदलाशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी आयएमएफच्या दोन आर्थिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत काम करत आहे.
पाकिस्तानचे आयएमएफसोबत सुरू असलेले आर्थिक सहाय्य कार्यक्रम
७ ऑक्टोबर रोजी आयएमएफने पाकिस्तानसोबत ७ अब्ज डॉलरच्या निधी सुविधा कार्यक्रमाच्या चौथ्या आढाव्याबाबत आणि १.४ अब्ज डॉलरच्या लवचिकता व शाश्वतता सुविधा कार्यक्रमाच्या तिसऱ्या आढाव्याबाबत कर्मचारीस्तरीय करार केला. या कराराला आयएमएफच्या कार्यकारी मंडळाने मंजुरी दिल्यास पाकिस्तानला सुमारे १.२१ अब्ज डॉलरचे अतिरिक्त आर्थिक सहाय्य मिळू शकतं. यामध्ये EFF अंतर्गत १ अब्ज डॉलर, तर RSF अंतर्गत २१० दशलक्ष डॉलरचा समावेश आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये मंजूर झालेल्या EFF कार्यक्रमाचा उद्देश पाकिस्तानची वित्तीय स्थिती मजबूत करणे, परकीय चलनाचा साठा पुन्हा वाढवणे आणि संरचनात्मक सुधारणा राबवणे हा आहे. मे २०२५ मध्ये मंजूर झालेला RSF कार्यक्रम हवामान बदलाचा सामना करण्यासाठी लवचिकता वाढवणे आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी मजबूत करणे यावर केंद्रित आहे.
मे २०२६ मध्ये या दोन्ही कार्यक्रमांच्या आढाव्यांनंतर आयएमएफने पाकिस्तानला सुमारे १.३२ अब्ज डॉलरचे आर्थिक सहाय्य मंजूर केले होते. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला मिळालेल्या एकूण निधीचे वितरण सुमारे ४.८ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले होते. नवीन कर्मचारीस्तरीय कराराला मंजुरी मिळाल्यास दोन्ही कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला मिळालेल्या एकूण निधीचे वितरण सुमारे ५.७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, असं आयएमएफने म्हटलं आहे.
दरम्यान, २०२६ ची आयएमएफ-जागतिक बँक वार्षिक बैठक १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान बँकॉक येथे होत आहे. या बैठकीत विविध देशांचे धोरणकर्ते, मध्यवर्ती बँकांचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. २०२७ ची वार्षिक बैठक ४ ते ९ ऑक्टोबरदरम्यान अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे होणार आहे.
