इस्लामाबाद  : सध्याचे हिवाळी हवामान लक्षात घेता अफगाणिस्तानातील नागरिकांना औषधे आणि अन्नधान्याचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानला आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा आणि आर्थिक मदत करावी, असे आवाहन चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे. पाकिस्तान सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दूरध्वनीवर अफगाणिस्तानबाबत चर्चा केली. त्यानंतर तेथील लोकांना आंतरराष्ट्रीय मदतीची गरज असल्याचे उभय नेत्यांनी म्हटले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानची राजवट प्रस्थापित झाली असून तेथील अस्थिरता आणि लोकांचे हाल संपविण्यासाठी अशा मदतीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी कतारमध्ये तालिबानच्या प्रतिनिधींशी विविध प्रश्नांवर चर्चा केल्याच्या दुसऱ्या दिवशी ही घडामोड झाली आहे. पाकिस्तान आणि चीन हे अनेक वर्षांपासून सहकारी असून त्यांनी गेल्या दोन महिन्यांत अफगाणिस्तानात मदत पाठविली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानचा निधी गोठविला असून तो मोकळा करावा, जेणेकरून अशा कठीण काळात त्याचा वापर करणे या देशाला शक्य होईल, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. सध्या अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेकडे ९०० कोटी डॉलर इतका राखीव निधी असून तालिबान सरकारला तो वापरता येत नाही. या निधीचा मोठा भाग न्यू यॉर्कच्या फेडरल रिझव्‍‌र्हमध्ये ठेवण्यात आला आहे.