पेशावर येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति एकात्मतेची भावना व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानातील ख्रिस्ती लोकांनी यंदा नाताळचा सण साजरा न करण्याचे ठरवले आहे.
देशातील सर्व अल्पसंख्याक पेशावरच्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतात. देशासोबत असल्याची भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही नाताळचा सण साजरा न करण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानातील सर्व चर्चेस आणि मंदिरांमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे, असे संघराज्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्रालयाचे सिनेटर कामरान मायकेल यांनी सांगितले.
२५ डिसेंबर रोजी पाकिस्तानातील ख्रिस्ती लोक प्रेम आणि एकतेचा संदेश देतील. कुठलाही धर्म मानवतेविरुद्धच्या दहशतवादाला परवानगी देऊ शकत नाही, असे मायकेल म्हणाले.
पेशावरच्या घटनेत निष्पाप मुले व इतर लोक मारले गेल्याबद्दल अल्पसंख्याकांना तीव्र दु:ख वाटते. पाकिस्तानमधील दहशतवाद संपवून त्याचे कल्याणकारी राज्यात रूपांतर करण्याकरिता सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत पंजाब प्रांताचे अल्पसंख्याक आणि मानवाधिकारमंत्री ताहीर सिंधू यांनी व्यक्त केले.