Rajnath Singh urges PoK: जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भारतात सामील होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आम्ही तुम्हाला आमचे समजतो, पण पाकिस्तान तुम्हाला विदेशी नागरिक समजतो.” आपला मुद्दा स्पष्ट करताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या अतिरिक्त महाअधिवक्ताने दाखल केलेल्या एका प्रतिज्ञापत्राचा हवाला दिला. ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर हा विदेशी भाग असल्याचे नमूद केले आहे.

पंबन विधानसभेतील भाजपाचे उमेदवार राकेश सिंह ठाकूर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना म्हणाले की, २०१९ साली अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आमूलाग्र बदल झाले आहेत. जम्मू-काश्मीर खोऱ्यातील मुलांच्या हातात आता पिस्तूल आणि बंदूकाऐवजी लॅपटॉप आणि संगणक आला आहे. यामुळे आता श्रीनगरच्या जनतेवर कुणीही गोळी झाडण्याची हिंमत करत नाही.

हे वाचा >> Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!

“तुम्ही जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचे सरकार स्थापन करण्यात पुढाकार घ्या, आम्ही याठिकाणी अभूतपूर्व असा विकास करून दाखवू. इथे होणारा विकास पाहून बाजूच्या पाकव्याप्त काश्मीरमधील लोक म्हणतील की, आम्हाला पाकिस्तानबरोबर राहायचे नाही, आम्हीही भारतात सामील होऊ”, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

पंबन विधानसभेत भाजपाचे उमेदवार ठाकूर यांचा सामना नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार अर्जून सिंह राजू यांच्याशी होणार आहे. तर अपक्ष उमेदवार सुरज सिंह परिहार हेदेखील दोघांना टक्कर देणार आहेत.

दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणूक

राजनाथ सिंह म्हणाले की, दहा वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होत असून याकडे फक्त भारताचेच नाही तर जगाचेही लक्ष आहे. जम्मू-काश्मीरचे लोक मेहनती आहेत. त्यांच्याकडे कौशल्य आहे. जर याला भाजपाच्या सत्तेची जोड मिळाली तर हा प्रदेश देशात सर्वात वरच्या स्थानी जाईल.

यासोबतच मागच्या वर्षी श्रीनगर येथे जी२० परिषदेचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावरून आम्ही जगाला दाखवून दिले की, काश्मीर हा दहशतवादाचा नाही तर पर्यटनाचा बालेकिल्ला आहे.