आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) ग्रे यादीमध्ये कायम राहणार आहे. एफएटीएफने बुधवारी यासंदर्भातील निर्णय घेतला. लष्कर आणि जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांना पोहोचणारी आर्थिक मदत थांबवण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. यामुळे बुधवारी एफएटीएफनं पाकिस्तानला ग्रे यादीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

चीनच्या शिय्यामिन लियू यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एफएटीएफच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवायचं की काळ्या यादीत टाकायचं यासंदर्भात चर्चा करण्यात येणार होती. यापूर्वीही फेब्रुवारी महिन्याच एफएटीएफची बैठक पार पडली होती. त्यावेळीही या यादीतून बाहेर पडण्यास पाकिस्तानला अपयश आलं होतं. लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत पुरवण्याचा आरोप पाकिस्तानवर करण्यात आला आहे.

त्या बैठकीनंतर एप्रिल २०२० पर्यंतची वेळ पाकिस्तानला देण्यात आली होती. तसंच त्यांना २७ पॉईंट अॅक्शन प्लॅनवर काम करण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु पाकिस्तानला त्यातही अपयश आलं. दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या कारणावरून एफएटीएफने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानला ग्रे यादीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत करणाऱ्यांना पाकिस्तान समर्थन देत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर एफएटीएफच्या दबावामुळे केवळ दाखवण्यासाठी पाकिस्ताननं काही दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई केली होती.