पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून २०२५ सालापर्यंत पाकिस्तान अण्वस्त्रधारी देशांमध्ये पाचव्या स्थानाचा देश ठरेल, असे अमेरिकेच्या थिंक टँकने प्रसिद्ध केलेल्या अहवाला नमूद करण्यात आले आहे. पाकच्या ताफ्यातील अण्वस्त्रांचा साठा सध्या ११० ते १३० च्या घरात आहे. २०११ साली हा साठा ९० ते ११० च्या घरात होता. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अमेरिका भेटीदरम्यान अणू शास्त्रज्ञांनी जाहीर केलेल्या 'पाकिस्तानी अण्वस्त्र २०१५' च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. प्लुटोनियम आणि युरेनियम निर्मितीच्या चार अद्ययावत सुविधांच्या उपलब्धतेमुळे पुढील १० वर्षात पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या २० वर्षांपासूनची पाकिस्तानची कामगिरी आणि सध्याच्या तसेच आगामी काळातील अण्वस्त्रांच्या निर्मितीचा उद्देशाचा अंदाज घेता २०२५ सालापर्यंत पाकिस्तानच्या ताफ्यात २२० ते २५० अण्वस्त्रांचा साठा होऊ शकेल असे झाल्यास पाकिस्तान जगातील पाचव्या क्रमांकाचा अण्वस्त्रधारी देश होईल, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.