पाकिस्तानची परिस्थिती खूप हलाखीची झालेली आहे. सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू घेणं देखील मुश्किल होत चाललं आहे. महागाईने पाकिस्तानात उच्चांक गाठला आहे. महागाईच्या संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे तेथील जनता सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्येही नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत रोष व्यक्त करत आहेत.

पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. पाकिस्तानातील प्रशासन व्यवस्था कोलमडल्याचं मोहसीन नक्वी यांनी म्हटलं होतं. तसेच जर ही व्यवस्था सुधारली नाही, तर हे ‘कॉक्रोच’ सर्व काही उलथवून टाकतील’, अशी भिती देखील नक्वी यांनी व्यक्त केली होती.

देशाचा दशकाहून जुना प्रशासकीय ढाचा पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचा आरोपही नक्वी यांनी केला होता. मोहसीन नक्वी यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानात सत्तापालटाच्या चर्चांनी जोर धरला. तसेच त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या सरकारमध्येही खळबळ उडाली होती. यानंतर अखेर मोहसीन नक्वी यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत पंतप्रधान शाहबाज शरीफ आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील असं म्हटलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मोहसीन नक्वी यांनी काय वक्तव्य केलं होतं?

गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी एकापाठोपाठ एक अशा दोन वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. एका समिटमध्ये बोलताना मोहसीन नक्वी यांनी देशाची प्रशासन व्यवस्था ‘कोलमडली’ असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठं भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणल्याचा दावा करत जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर खटला चालवला जाणार असल्याचं सूचक भाष्यही नक्वी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानात खरंच सत्तापालट होणार का? या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्या या वक्तव्यामुळे शाहबाज शरीफ आणि मोहसीन नक्वी यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. तसेच संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तर नक्वी यांचं वर्णन एक ‘पॉवरहाऊस’ असं केलं. त्यामुळे या वक्तव्याचा नेमकं अर्थ काय? याबाबतही उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

मोहसीन नक्वी यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

“व्यवस्था नष्ट झाली आहे. मात्र, याचा अर्थ शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरोप करणं असा होत नाही. आपण पाकिस्तानच्या जुन्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल बोलत होतो. जुनी प्रशासकीय व्यवस्था जर योग्यरित्या कार्यरत असती तर पाकिस्तानने यशाची नवी शिखरे गाठली असती”, असं स्पष्टीकरण देत नक्वी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

“जर असे पंतप्रधान असतील जे दिवसाला १४ ते १६ तास काम करतात, जर सध्याची परिस्थिती सुधारली, तर त्याचे परिणाम हजार पटीने अधिक चांगले असतील. जर पंतप्रधानांनी अधिक चांगल्या व्यवस्थेत काम केलं असतं, तर ते पाकिस्तानला शंभर पटीने अधिक पुढे नेऊ शकले असते. मात्र, काही व्यक्ती मी आणि शाहबाज यांच्यात मतभेद निर्माण करू इच्छित आहेत”, असंही मोहसीन नक्वी यांनी म्हटलं आहे.

“पंतप्रधान शाहबाज शरीफ हे त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील असा विश्वास आहे. तसेच सरकारचं भविष्य म्हणजे आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणं हेच आहे. शाहबाज शरीफ पाच वर्षे पंतप्रधान राहतील. ते आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील”, असा दावाही मोहसीन नक्वी यांनी केला.