मुंबईवरील सर्वात मोठय़ा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर झाकी-उर-रहमान लख्वी याला तुरुंगात डांबून ठेवणे बेकायदा असल्याचे स्पष्ट करीत इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्याच्या तातडीने सुटकेचे आदेश दिले आहेत. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने याप्रकरणी आपला आदेश राखून ठेवला होता. न्यायमूर्ती नूरूल हक यांनी शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी सरकारला लख्वीच्या सुटकेचे आदेश दिले.
तुरुंगात लख्वीला ऐषारामाचे आयुष्य
लख्वीप्रकरणी याआधी झालेल्या सुनावणीवेळी ५ मार्च रोजी पाकिस्तान सरकारने लख्वीवर असलेल्या आरोपांची सविस्तर यादीच न्यायालयापुढे सादर केली होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासह अफगाणिस्तानच्या एका नागरिकाचे अपहरण केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी पाकिस्तान सरकार लख्वीविरोधात आणखी एक गुन्हा नोंदविण्याचा कट रचित असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. अफगाणिस्तानमधील नागरिकांचे अपहरण केल्याचा लख्वीवर ठेवण्यात आलेला आरोप खोटा असल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले.