२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीर याला पाकिस्तानात ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. एफबीआयने मीरला फरार दहशतवादी घोषित केले होते. परदेशी सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा कट रचणे, दहशतवाद्यांना मदत करणे, अमेरिकेबाहेर एका नागरिकाची हत्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट करणे या आरोपांवरून अमेरिकच्या तपास यंत्रणेने मीरला फरार दहशतवादी घोषित केले होते. मुंबई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १६६ लोकांमध्ये सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. एफबीआयने मीरला अटक करून दोषी ठरवण्यासाठी ५ दशलक्ष डॉलर पर्यंतचे बक्षीस ठेवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तान सरकार नेहमीच साजिद मीरबद्दल खोटी माहिती देत आली आहे. पाकिस्तानने नेहमीच साजिद मीरची तिथे असल्याचे नाकारले आहे. पाकिस्तानने तर साजिद मीरचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. आता पाकिस्तान आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा असताना वित्तीय कृती दलाकडून (एफएटीएफ) दिलासा मिळण्याची अपेक्षा करत आहे. त्यामुळे  पाकिस्तानला दहशतवादाचे डाग कमी करायचे आहेत.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीरच्या शिक्षेची माहिती एका वरिष्ठ वकिलाने दिली आहे. हे वकील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाच्या म्होरक्यांविरुद्ध दहशतवादासाठी वित्तपुरवठा प्रकरणांशी संबंधित आहेत. त्यांनी पीटीआयला सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने लष्करशी संबंधित साजिद मजीद मीरला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्याला चार लाखांहून अधिक रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ४५ वर्षांचा साजिद मीरला एप्रिलमध्ये अटक करण्यात आली होती, तेव्हापासून तो लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात आहे.

साजिदच्या शिक्षेवर पंजाब पोलिसांचे मौन

पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांचे काउंटर टेररिझम डिपार्टमेंट अनेकदा माध्यमांना अशा प्रकरणांची माहिती देत ​​असते, पण साजिद मीरच्या शिक्षेबाबत त्यांनी मौन बाळगले आहे. या शिक्षेची आणि न्यायालयीन कारवाईची माहितीही प्रसारमाध्यमांना नव्हती कारण ती तुरुंगाच्या आतील एका बंद खोलीत करण्यात आली होती, जिथे माध्यमांना जाण्याची परवानगी नव्हती.

साजिद मीर भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक

साजिद मीर भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत आहे. त्याला मुंबई हल्ल्याचा सूत्रधार म्हटले जाते. हल्ल्यापूर्वी तो २००५ मध्ये बनावट पारपत्रावर आणि बनावट नावावर भारतात आला होता. साजिद मीरसह डेव्हिड कोलमन हेडली आणि इतर दहशतवाद्यांनी मुंबईतील दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. तो लष्कराचा नेता हाफिज मोहम्मद सईदचा जवळचा मानला जातो. भारतच नाही तर अमेरिकाही साजिद मीरचा गेल्या एक दशकापासून शोध घेत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan court has awarded over 15 years jail 2611 planner sajid mir abn
First published on: 25-06-2022 at 08:26 IST