न्यायाधीशांची स्थानबद्धता प्रकरण न्यायाधीशांना स्थानबद्ध करण्याच्या खटल्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहिल्याबद्दल पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले आहे. मुशर्रफ यांच्या परदेशवारीवर घालण्यात आलेले र्निबध सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतर ते गेल्या महिन्यात दुबईला उपचारासाठी गेले असून ते दहशतवादविरोधी न्यायालयात हजर नव्हते. पाकिस्तानात २००७ मध्ये आणीबाणी जाहीर केल्यानंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना स्थानबद्ध केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनवाईला मुशर्रफ गैरहजर राहिल्याबद्दल न्यायालयाने नापसंती व्यक्त केली. परदेशात जाण्यापूर्वी मुशर्रफ यांनी न्यायालयाची परवानगी घ्यावयास हवी होती, असे न्या. सोहेल इक्रम म्हणाले. सरकारने परवानगी दिल्यानंतर मुशर्रफ परदेशात गेले असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला, मात्र त्याने न्यायालयाचे समाधान झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुशर्रफ यांना परदेशात जाण्याची मुभा देण्यात आली हे सरकारी वकिलांचे म्हणणेही न्यायालयाने फेटाळले. त्यानंतर दहशतवादविरोधी न्यायालयाने मुशर्रफ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले. यापूर्वीही मुशर्रफ यांच्याविरोधात अनेकदा वॉरण्ट जारी करण्यात आले होते, मात्र सुरक्षा आणि प्रकृती अस्वास्थ्य ही कारणे देऊन त्यांनी या आदेशांचे उल्लंघन केले होते.