scorecardresearch

व्हॉट्सअॅपवर मेसेज करणं पडलं महागात; कोर्टाने महिलेला सुनावली फाशीची शिक्षा, वाचा नेमकं काय घडलं?

महिलेला फाशीची शिक्षा झाल्यापासून ती चर्चेत आली आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

पाकिस्तानमध्ये न्यायालयाने एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ईश्वरनिंदेच्या आरोपामुळे या महिलेला शिक्षा सुनावण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप महिलेवर आहे. हे प्रकरण थोडं जुनं आहे, पण महिलेला फाशीची शिक्षा झाल्यापासून ती चर्चेत आली आहे.

महिलेवर ईश्वरनिंदा केल्याचा आरोप असलेले हे प्रकरण रावळपिंडी कोर्टाशी संबंधित आहे. या प्रकरणी फारुख हसनत नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून रावळपिंडी कोर्टाने ही शिक्षा दिली आहे. फारुख हसनत यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने महिलेला सायबर कायद्याचे उल्लंघन, धर्माचा अपमान आणि प्रेषित मुहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिका अतीकने २०२० मध्ये फारुखला व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये ईशनिंदा संबंधित काही गोष्टी शेअर केल्या होत्या. यावर फारुख यांनी असे मेसेज तात्काळ डिलीट करून माफी माग असे तिला म्हटले होते, मात्र महिलेने तसे करण्यास नकार दिला होता. महिलेने नकार दिल्यानंतर फारुखने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर अनिका अतीकला अटक करण्यात आली.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, फारुख हसनत आणि आरोपी महिला दोघेही एकेकाळी मित्र होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते आणि महिलेने रागाच्या भरात फारुखला व्हॉट्सअॅपवर काही निंदा करणारे संदेश पाठवले. सुरुवातीला महिलेला ते हटवण्यास सांगण्यात आले, मात्र तिने नकार दिल्यानंतर प्रकरण कोर्टात पोहोचले. आता रावळपिंडी न्यायालयाने या प्रकरणी महिलेला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे.

पाकिस्तानमध्ये ८० च्या दशकात माजी लष्करी हुकूमशहा झिया-उल-हक यांनी ईशनिंदा कायदा लागू केला होता. या कायद्यांतर्गत अनेकवेळा फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत कोणालाही फाशी देण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी, एका श्रीलंकन ​​नागरिकाला ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या घटनेत ठार झालेला व्यक्ती सियालकोट कारखान्यात व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pakistan court sentence to death to girl over whatsapp massage in blasphemy case hrc

ताज्या बातम्या