Pakistan Court Verdict Minor Girl: पाकिस्तानच्या न्यायालयाने एका धक्कादायक आणि तितकाच वादग्रस्त निर्णय दिला आहे. १३ वर्षीय ख्रिश्चन मुलीबरोबर ४० वर्षीय मुस्लिम व्यक्तीचा विवाह वैध ठरविण्यात आला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अल्पवयीन मुले आणि अल्पसंख्यांकांचे हक्क याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. न्यायालयाचा निर्णय समोर आल्यानंतर देशभरात ख्रिश्चन समुदायातील नागरिक रस्त्यावर उतरले असून, न्यायाची मागणी करत आहेत.

न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध

देशातील न्यायप्रणालीचे हे अपयश आहे, अशा शब्दात लाहोरमधील कॅथलिक चर्चने न्यायालयाचा निर्णयाचा निषेध केला. “न्यायालयाच्या या निर्णयामुळे अल्पवयीन मुलांचा विवाह आणि जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला बळकटी मिळेल”, असा आरोप लाहोर चर्चच्या आर्चबिशप खालिद रहमत यांनी केला आहे. “या निर्णयामुळे ख्रिश्चन समुदायाला खूप दु:ख झाले”, असेही रहमत यांनी म्हटले आहे. मारिया शाहबाज या १३ वर्षीय मुलीचे अपहरण करुन जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोपही आर्चबिशप यांनी केला आहे.

आर्चबिशप यांच्याकडून टीका

आर्चबिशप खालिद रहमत यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, “ख्रिश्चन अल्पवयीन मुलगी मारियाचे अपहरण करुन जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. या मुलीच्या लग्नात तिची सहमती नसल्याने याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशातील मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पाकिस्तानच्या कायद्याला धरुन हा निर्णय नाही. देशात लग्नाचे कायदेशीर वय १८ वर्षे आहे”, असे आर्चबिशप खालिद यांनी म्हटले आहे. अशाप्रकारच्या खटल्यांचा निकाल देताना अस्तित्वात असलेल्या कायद्याचा आधार घ्यायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

पुन्हा तपास करण्याची मागणी

जबरदस्तीने अल्पवयीन मुलीचे लग्न करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील अल्पसंख्यांकांच्या हक्काबाबतही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याचा पूर्ण तपास करुन, आरोपांची सत्यता पडताळून तसेच, अल्पवयीन मुलीचे लग्न आणि धर्मांतर केल्याचा आरोप याचा पुन्हा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणीही आर्चबिशप यांनी केली आहे. याप्रकरणात आवश्यक सहकार्याची ग्वाही चर्चकडून देण्यात आली.

चुकीचा संदेश गेल्याची भावना

मारिया शाहबाजच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मारियाचे अपहरण करुन तिचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. २९ जुलै २०२५ रोजी ती केवळ १२ वर्षांची होती, असेही तिच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजात चुकीचा संदेश गेल्याची भावाना ख्रिश्चन समुदायाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.