Pakistan -Taliban Afghanistan War: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. दोन्ही देशातील सीमेवर चकमक झाल्यानंतर पाकिस्तानने काबूल आणि कंदाहारवर बॉम्बहल्ला करत युद्धाची घोषणा केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पाकिस्तानने अफगाणमध्ये प्राणघातक हवाई हल्ला केला. याला उत्तर म्हणून अफगाण तालिबान सरकारने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आमचा संयम संपल्याचे म्हणत उघड युद्ध सुरु झाल्याचे म्हटले.
कतारकडून मध्यस्थीचा प्रयत्न आणि आसिफ यांची पोस्ट
उभय देशातील संघर्ष शिगेला गेला असताना कतारकडून मध्यस्थीचा प्रयत्न झाला. पण, संघर्ष थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. दरम्यान, दोन्ही देशांनी दुसऱ्या बाजूचे डझनभर सैनिक मारल्याचा दावा केला आहे. अशात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेली एक्स पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. “आमचा संयम संपला आहे. आमच्यात आणि तुमच्यात उघड युद्ध सुरू झाले आहे,” असे आसिफ यांनी एक्स वर पोस्ट केले आहे.
अफगाणिस्तानचा दावा काय?
पाकिस्तानने दक्षिणेकडील कंदाहार आणि आग्नेय प्रांत पक्तियामध्येही हवाई हल्ले केले, अशी माहिती तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दिली आहे. काबूलमध्ये किमान तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले, परंतु अफगाणिस्तानच्या राजधानीत झालेल्या हल्ल्यांचे नेमके ठिकाण किंवा संभाव्य जीवितहानी याबद्दल माहिती मिळालेली नाही.
पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेजवळ हवाई हल्ला केल्यानंतर यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या उत्तर म्हणून अफगाणी सैन्याकडून पाकिस्तानवर गुरुवारी रात्री हल्ला केला.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ काय म्हणाले?
“नाटो सैन्याने माघार गेल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि तालिबान अफगाण सरकार लोकांचे हित आणि प्रादेशिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करेल अशी अपेक्षा होती. पण, तालिबानने अफगाणिस्तानला भारताची वसाहत बनली आहे, असा आरोप ख्वाजा आसिफ यांनी केला. तालिबानकडून पाकिस्तानला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याला आमचे सशस्त्र दल निर्णायक प्रत्युत्तर देत आहे”, असे आसिफ यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“आता आमच्या संयमाची मर्यादा संपली असून, हा उघड संघर्ष आहे. आता निर्णायक कारवाई होईल. आम्ही तुमचे शेजारी आहोत, आम्हाला तुमचे वास्तव चांगले माहित आहे”, असा इशारा आसिफ यांनी दिला आहे.

पाकिस्तानचा दावा काय?
असोसिएटेड प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या सैन्याने काबूल, कंदाहार आणि पक्तिया प्रांतातील अफगाण लष्करी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात दोन ब्रिगेड तळ उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जात आहे. पण कोणत्याही संभाव्य जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
इस्लामाबादने अफगाण तालिबानविरुद्ध ऑपरेशन गझब लिल-हक सुरु केल्याचे पाकिस्तानी मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी तालिबानच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी केवळ दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

