पाकिस्तानने श्रीनगरमधून उड्डाण करणाऱ्या विमानांना आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास नकार दिला आहे. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर ते शारजाहपर्यंतच्या विमानांसाठी पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करून देण्यास नकार दिला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम जम्मू-काश्मीरमधील लोकांना होणार आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या या निर्णयामुळे श्रीनगर ते शारजाहपर्यंतचा विमान प्रवास एक तासांपेक्षा जास्त लांबणार आहे. श्रीनगरहून उड्डाण करणारी विमाने आता श्रीनगरहून उदयपूर, अहमदाबाद आणि ओमानमार्गे जातील. शिवाय वेळ आणि प्रवास वाढल्यास प्रवासाचा खर्च वाढून तिकीट महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

या निर्णयाला अत्यंत दुर्दैवी संबोधून, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले, “पाकिस्तानने २००९-२०१० मध्ये श्रीनगर ते दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानासोबत असेच केले होते. मला आशा होती की गो फर्स्टला पाकच्या हवाई हद्दीत जाण्याची परवानगी दिली जाईल,” असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, पाकिस्तानच्या या निर्णयामुळे श्रीनगर ते शारजाहपर्यंतचा विमान प्रवास एक तासांपेक्षा जास्त लांबण्याची शक्यता असून याचा सर्वाधिक फटका जम्मू-काश्मीरच्या लोकांना बसणार आहे.